Join us  

'आपल्या हातून देव घडतोय'; म्हणत लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्वत: घडवली बाप्पाची मुर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 3:42 PM

Kunjika kalvit: कुंजिकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती  तिच्या घरच्या बाप्पाची मुर्ती घडवत आहे.

'स्वामिनी', 'ती परत आलीये' अशा काही गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे कुंजिका काळवीट (kunjika kalvit). मालिकांसह चित्रपटामध्ये झळकलेल्या कुंजिकाला सध्या गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यामुळे बिझी शेड्युलमधून वेळ काढत ती बाप्पाची मुर्ती घडवण्यात दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुंजिकाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बाप्पाची मुर्ती घडवताना दिसत आहे.मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो हे साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यात कुंजिका गिरगावात लहानाची मोठी झाल्यामुळे तिच्यासाठी गणेशोत्सव म्हणजे पर्वणीच असते. त्यामुळे यावेळी बाप्पाचं स्वागत करण्यासाठी तिने मोठी जल्लोषात तयारी केली आहे. यात घरच्या गणरायाची मुर्तीदेखील ती स्वत: घडवत आहे.

कुंजिकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती  तिच्या घरच्या बाप्पाची मुर्ती घडवत आहे. गिरगावातील प्रसिद्ध मूर्तिकार मादुस्कर यांच्याकडे कुंजिकाच्या घरचा बाप्पा येतो. त्यामुळे कुंजिकाने मादुस्करांचा कारखाना गाठत यंदा त्यांच्या बाप्पाची मुर्ती घडवली. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

"साध्या मातीला येणारं देवपण श्रध्देने जागृत होतं, त्या मूर्तीचं तेज म्हणजे प्रत्यक्ष मुर्तीकाराने कलेपोटी त्यात फुंकलेले प्राण! कलेचं सौंदर्य समृद्ध असतं त्यात आव नाही तर असतो तो निर्मळ भाव...  दरवर्षी ख्यातनाम मूर्तिकार "मादुस्कर गणपति" कडून आमच्या घराची मूर्ती तयार होते. पण, यावर्षी ती घडवण्याचा प्रयत्न आपण करावा असं "मादुस्कर गणपति" चे गणेश मादुस्कर यांनी सुचवले आणि बाप्पाने ते प्रत्ययास आणून घेतलेच! गणेश मादुस्कर यांच्या मार्गदर्शनाने मी ही मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाची जाण ठेऊन इको-फ्रेंडली लाल मातीचा वापर केला आहे. त्याच्या साच्यांपासून, त्याच्या हात-पायाला आकार देणे, त्याच्या आसनासाठीचे सिंहासन, त्याच्या हातावरचा मोदक, त्याचे भावपूर्ण, तेजस्वी पण अतिशय प्रेमळ डोळे हे सगळं साकारताना आपल्या हातून देव घडतोय ह्याचं खूप अप्रूप वाटलं.तुझे ठायी माझी भक्तीविरुधावी गणपतीतुझे ठायी ज्याची कीर्तीत्याची घडावी संगती !

दरम्यान, कुंजिकाचा एपिलोग हा सिनेमा नुकताच यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. तसंच लवकरच तिचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अंकित मोहन स्क्रीन शेअर करणार आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजनगणेशोत्सव