Join us

"माझा टॉप हलका वर आला अन् निर्मात्याने...", अमृता सुभाषने सांगितला धक्कादायक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:31 IST

प्रसिद्ध निर्मात्याने रात्री उशिरा बोलवलं होतं...अमृताला दोन वेळा आलाय वाईट अनुभव

अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash)  मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय चेहरा आहे. दोन्ही इंडस्ट्रीत तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती आगामी 'जारण' सिनेमामुळे चर्चेत आहे. काळ्या जादूवर आधारित या सिनेमात तिची महत्वाची भूमिका आहे. थिएटर ते मोठा पडदा असा अमृताचा प्रवास राहिला आहे. नुकतंच अमृताने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला. एका निर्मात्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. नक्की काय घडलं?

'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत अमृता सुभाषने जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तिने एक धक्कादायक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, "एकदा मी पायऱ्यांवरुन चढत असताना माझा टॉप हलका वर आला. तेव्हाच कोणीतरी माझ्या कंबरेला हात लावला. मी लगेच मागे वळून बघितलं तर तो एक प्रसिद्ध ज्येष्ठ निर्माता होता. मी तिथल्या तिथे त्याला फटकारलं. 'काय करतोय तू?, काय प्रकार होता हा? असं म्हणत मी त्याला खडसावलं. तर त्या निर्मात्याने उलट माझ्या कपड्यांनाच दोष दिला. मी त्याला म्हटलं माझे कपडे नीट करणं तुझं काम नाहीए. मला स्पर्श करण्याची तुझी हिंमत कशी झाली?" 

ट्रेनमध्ये आला विचित्र अनुभव

ती पुढे म्हणाली, "या घटनेनंतर मला काम मिळणार नाही असं लोक म्हणायला लागले. पण मला त्यामुळे काहीही फरक पडणार नव्हता. घाबरुन राहण्यापेक्षा आपला आत्मसम्मान महत्वाचा आहे. आपल्या देशात महिलांना अनेकदा अशा घटनांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक ठिकाणी त्यांना असे अनुभव येतात. एकदा ट्रेनमध्ये मला एका छोट्या मुलानेही चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी त्याला शिक्षा न देता नीट प्रेमाने त्याची चूक समजावून सांगितली होती जेणेकरुन तो भविष्यात कोणासोबत असं वागणार नाही."

आत्मविश्वासाने सामना करा

आणखी एक घटना सांगताना अमृता म्हणाली, "एका ज्येष्ठ निर्मात्याने मला रात्री उशिरा घरी दारु प्यायला बोलवलं होतं. मी त्याच्या खोलीत जाऊन त्याला सुनावलं होतं. सर, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. माझ्याशी अशा पद्धतीने का बोलत आहात? असं मी त्यांना विचारलं. मी माझ्या सुरक्षेसाठी मुद्दामून दरवाजाही उघडाच ठेवला होता. आपण आवाज उठवला की असे लोक आपल्याशी बोलायलाही घाबरतात. पण आपणच घाबरलेलो दिसलो तर ते आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात. पण आपण आत्मविश्वासाने  त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सामना केला पाहिजे."

टॅग्स :अमृता सुभाषमराठी अभिनेताविनयभंगकास्टिंग काऊच