Join us  

अभिनेता स्वप्नील जोशीने 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त मुलांसह दिल्या शुभेच्छा, खास व्हिडीओ केला पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 3:41 PM

अभिनेता स्वप्नील जोशीने 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त मुलांसह शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी प्रेमी व्यक्तींबरोबरच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे संदेश, विचार सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रसिद्ध साहित्यिक वि.वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी हा दिवस 'मराठी राजभाषा दिवस' म्हणून राज्यात साजरा केला जातो. मराठी दिवसाचे औचित्य साधत अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या दोन लहानग्या मुलांबरोबर सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वप्नील जोशी याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत स्वप्नील आपल्या लाडक्या मुलांसोबत पाहायला मिळतोय. व्हिडीओमध्ये दिसते की, स्वप्नील आपल्या मुलांना त्यांची नावे सांगा असे म्हणतो. तेव्हा मुले त्यांची नावे राघव आणि मायरा, अशी सांगतात. त्यानंतर स्वप्नील आणि त्याची दोन्ही मुले शुभेच्छा देत एकत्र म्हणतात की, आमच्यातर्फे तुम्हा सर्वांना 'मराठी भाषा दिना'च्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद, जय महाराष्ट्र!'. स्वप्नीलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

स्वप्नील जोशीने उत्तम अभिनय आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर स्वप्नीलने कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारा स्वप्नील कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते.  स्वप्नीलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो पुरस्कारविजेते चित्रपट निर्माते परेश मोकाशी यांच्या 'नाच गं घुमा' या आगामी चित्रपटातून स्वप्नील जोशी निर्माता म्हणून पदार्पण करीत आहे. तसेच १९ वर्षांनंतर येणाऱ्या "नवरा माझा नवसाचा-२' या चित्रपटातून तो प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :स्वप्निल जोशीसेलिब्रिटीमराठी चित्रपटमराठी अभिनेतामराठी भाषा दिन