Join us

अभिनय बेर्डे, श्रिया पिळगावकर,आदिनाथ कोठारे जनरेशन नेक्स्ट पूर्ण करणार रसिकांचे हे स्वप्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 12:08 IST

एखादा फोटो लाख शब्दाच्या भावना व्यक्त करुन जातो असं म्हणतात. फोटोतील व्यक्तींच्या चेह-यावरील हावभाव, त्या फोटोतील व्यक्तींचे डोळे बरेच ...

एखादा फोटो लाख शब्दाच्या भावना व्यक्त करुन जातो असं म्हणतात. फोटोतील व्यक्तींच्या चेह-यावरील हावभाव, त्या फोटोतील व्यक्तींचे डोळे बरेच बोलके असतात. त्यातच तो फोटो कुण्या सेलिब्रिटींचा असेल तर त्याच्या चर्चा तर होतातच. अशीच चर्चा सध्या एका फोटोची सुरु आहे. या फोटोमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची जनरेशन नेक्स्ट एकत्र पाहायला मिळत आहे. महेश कोठारे यांचा लेक आदिनाथ कोठारे, सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे एकत्र या फोटोत दिसत आहेत. हा फोटो मराठी रसिकांसाठी खास असा म्हणावा लागेल. या फोटोची विशेष चर्चा होण्यामागेही खास कारण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेता महेश कोठारे, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी कित्येक सिनेमांमध्ये एकत्र झळकली. हीच बाब अभिनेता सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबतही म्हणता येईल. लक्ष्याची जोडी सचिन आणि महेश कोठारे या दोघांसोबतही चांगलीच जमली. या जोडीने विविध सिनेमांमधून रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घातला. मात्र महेश कोठारे, सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची एकत्र जोडी रसिकांना एकत्र एका सिनेमात पाहता आली नाही.महेश कोठारे आणि सचिन हेसुद्धा एकत्र सिनेमात झळकले नव्हते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'आयडियाची कल्पना' या सिनेमात सचिन आणि महेश कोठारे हे एकत्र झळकले. मात्र महेश-सचिन आणि लक्ष्या यांना एकत्र पाहण्याची रसिकांची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही. मात्र याच कलाकारांची सेकंड जनरेशनही आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे. महेश कोठारे यांचा लेक आदिनाथने तर बालकलाकार म्हणून या चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 'एकुलती एक' या सिनेमातून अभिनेता सचिन यांची लेक श्रिया पिळगावकरने मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री केली तर काही महिन्यांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय बेर्डे 'ती सध्या काय करते' म्हणत रुपेरी पडद्यावर दाखल झाला. आता तिन्ही कलाकारांची मुलं आपापल्या अभिनय करियरमध्ये चांगलेच स्थिरावले आहेत. महेश-सचिन आणि लक्ष्या यांनी एकत्र एका सिनेमात काम करण्याचं मराठी रसिकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. मात्र त्यांच्या जनरेशन नेक्स्टने त्यांचं हे स्वप्न पूर्ण करावं अशी मराठी रसिकांची नक्कीच इच्छा असेल. सध्या हे स्वप्न काहीसं दूर असलं तरी या तिन्ही बड्या कलाकारांच्या एकत्र फोटोमुळे त्या चर्चा सुरु झाल्यात. सिनेमाआधी त्यांना फोटोत एकत्र पाहणं हेही मराठी रसिकांसाठी नसे थोडके असं म्हटल्यास वावगं ठरु नये.