Join us

"इन्स्टाग्रामवर चिखल करण्यापेक्षा..." शेतीकामावरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 16:51 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिजीत केळकर कोकणातील आपल्या गावात भात लावणीसाठी पोहोचलाय.

Abhijeet Kelkar Farming Video: मराठी अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) हा अभिनयासोबतच आपल्या मातीशी नातं कायम ठेवणारा कलाकार म्हणून ओळखला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावच्या शेतीत भात लावणीला गेला आहे. आपल्या मळ्यात तो सध्या भात पिकवत आहे. नुकतंच अभिजीतने काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यात तो भात लागवड करताना दिसून आला. मात्र सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांचीही कमी नाही. यावरुन काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केला.  पण, अभिजीत केळकर याने ट्रोल करणाऱ्यांना चपखल उत्तर दिलंय.

अभिजीत केळकरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये तो कोकणात भातलावणी करताना दिसला. शेतीचा अनुभव शेअर करत अभिजीतने लिहिलं, "शेतीचे कष्ट काय असतात हे अनुभवण्यासाठी गेल्यावर्षीही आलो होतो आणि यावर्षी पुन्हा आलो आहे. हा अनुभव शब्दांत सांगता येण्यासारखा नाही. हा अनुभव अवर्णनीय आहे. खूप मज्जा येत आहे". 

याशिवाय अभिजीतचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यात तो शेतात जेवण करताना दिसतोय. त्यात तो म्हणतो, "काल मस्त नांगरणी झाली, लावणी केली थोडी. आज शेतावर जेवायला बसलोय. काहींना वाटतं मी हे व्हिडीओसाठी करतो. पण, यातून मला काय आनंद मिळतो, ते मलाच माहिती आहे. म्हणून ज्यांना जे बोलायचं बोला, मी माझा आनंद घेतो", असं म्हटलं. 

या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी सकारात्मक कमेंट्स करत अभिजीतचं कौतुक केलं. पण, मात्र, एका नेटकऱ्याने "शेती करण्याची ही कोणती पद्धत?" अशी खोचक कमेंट केली. यावर अभिजीतने शांत न राहता सडेतोड उत्तर दिलं. तो म्हणाला," असं इन्स्टाग्रामवर बसून, नुसतं वाईट कमेंट्स करुन काहीच कळणार नाही, इन्स्टाग्रामवर चिखल करण्यापेक्षा ह्या खऱ्या चिखलात उतरून बघ, लगेच कळेल". अभिजीत केळकरने केवळ अभिनयातच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही जमिनीशी नातं कायम राखलेलं आहे, हे त्याच्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

टॅग्स :अभिजीत केळकरशेतीकोकण