Join us

"साध्या घरातला माणूस तो, पण त्याने..."; भरत जाधवनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेंचा 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:33 IST

Bharat Jadhav And Laxmikant Berde : नुकतेच अभिनेता भरत जाधवने एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक किस्सा सांगितला.

कॉमेडीचं अचूक टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी चतुरस्त्र अभिनेता म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. करिअरमध्ये कितीही चढउतार आले तरी ते डगमगले नाहीत आणि लाडका लक्ष्या म्हणून त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी सिनेमाच नाही तर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. ते आता जगात नसले तरी त्यांचे सहकलाकार आणि प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे. नुकतेच अभिनेता भरत जाधव(Bharat Jadhav)ने एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक किस्सा सांगितला. 

भरत जाधवने नुकतेच आरपार ऑनलाईनला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल सांगितले. तो म्हणाला की, ''मला त्या माणसाने मला खूप मदत केलीय. साध्या घरातला माणूस तो पण त्याने पण प्रत्येक टॅलेंटेड पोराला हात दिलाय. एकदा आम्ही एका सिनेमाचं शूटिंग करत होतो. त्यावेळी माझं नाटक बरं चाललं होतं. चांगलं चालू होतं. पछाडलेला सिनेमा यायच्या आधीचा तेव्हा माझं शूटिंग थांबलं आणि त्याचं लवकर पॅकअप झालं होतं आणि ते मुंबईला निघणार होते. त्यावेळी स्वानंदी आणि अभिनय छोटा होता. प्रिया ताई ते एकत्र मुंबईला जात होते.''

''हा आशीर्वाद नाही तर काय आहे''

भरत जाधवने पुढे सांगितले की, ''माझी पत्नी सरिता आणि मुलगी सुरभी माझ्यासोबत तिथे आले होते. त्यांना मी दुसऱ्या दिवशी वेगळ्या गाडीने पाठवणार होतो. तर मला म्हणाले नाही नाही मी चाललोच आहे तर मी सोडतो पवईला. तेव्हा मी पवईला राहत होतो. त्या माणसाने व्यवस्थित माझी मुलगी सुरभीची काळजी घेतली. जिथे मी पवईला राहत होतो तिथे तर त्या घरापर्यंत येऊन मग त्यांनी सांगितलं की 'अच्छा इथे का?' काय सरिता म्हणाली, 'अमक्या अमक्याचं घर...' 'ते पण घ्यायला सांग भरतला... घेणार तो आता बघ सरीता... हे पण घ्यायला सांग.' हा आशीर्वाद नाही तर काय आहे.''

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेभरत जाधव