Join us  

सखीने दिला होता आईला दुसरं लग्न करण्याचा सल्ला; 'या' कारणामुळे शुभांगी गोखलेंना थाटला नाही दुसरा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 9:12 AM

Shubhangi gokhale: सखी लहान असतानाच मोहन गोखले यांचं निधन झालं. मात्र, तरी सुद्धा शुभांगी गोखलेंनी आपल्या लेकीसाठी हे दु:ख बाजूला सारुन त्या मोठ्या हिमतीने कलाविश्वात पुन्हा काम करु लागल्या

मराठी कलाविश्वातील गुणी आणि सालस अभिनेत्री म्हणजे शुभांगी गोखले. टीव्ही मालिकांमधील प्रेमळ आई अशी सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यामुळे छोटा पडदा असो वा मोठा आपल्या अभिनयशैलीमुळे त्यांनी कलाविश्वात त्यांचा दबदबा निर्माण केला आहे. सध्या त्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. शुभांगी गोखले यांच्याप्रमाणेच त्यांचा लेक आणि जावईदेखील कलाविश्वात कार्यरत आहेत. इतकंच कशाला त्यांचे पती अभिनेता मोहन गोखले हेदेखील मराठीतील गाजलेले अभिनेता होते. मात्र, फार कमी वयात त्यांचं निधन झालं. विशेष म्हणजे मोहन गोखले यांच्या निधनानंतर शुभांगी यांनी कधीही दुसरं लग्न केलं नाही. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी दुसरं लग्न का केलं नाही यामागचं कारण सांगितलं.

सखी लहान असतानाच मोहन गोखले यांचं निधन झालं. मात्र, तरी सुद्धा शुभांगी गोखलेंनी आपल्या लेकीसाठी हे दु:ख बाजूला सारुन त्या मोठ्या हिमतीने कलाविश्वात पुन्हा काम करु लागल्या. या काळात अनेक अडचणी आल्या तरी त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. शुभांगी यांनी एकल पालकत्व स्वीकारुन सखीचा सांभाळ केला.  या काळात त्या दुसरं लग्न करु शकल्या असत्या पण त्यांनी ते केलं नाही. ज्यावेळी सखी कळत्या वयात आली त्यावेळी तिने सुद्धा आईला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे दोन खास कारणं होती.

या कारणामुळे शुभांगी गोखलेंनी केलं नाही दुसरं लग्न

एका मुलाखतीमध्ये शुभांगी गोखले यांनी दुसरं लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं. "मोहनचे जे गुण होते, त्याच्यासोबतचे अनुभव या सगळ्या गोष्टींनी मला खूप प्रेम दिलं. त्याच्या वागण्याचा त्रास झाला असेल, पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. शुटिंगसाठी त्याला घरातून निघायचं असायचं. पण, तिथे गेल्यावर एखाद्या अभिनेत्रीसोबत काम करायचंय हे कळलं की तो थेट शूटिंगला जाणार नाही असं म्हणायचा. अशा वेळी या माणसाला कसं समजवायचं हा प्रश्न पडायचा. तो काही माझ्यासोबत दृष्टासारखा वागायचा नाही. खूप लोक मला विचारतात की दुसरं लग्न का केलं? पण मोहनच्या जाण्याने मला एवढं दुःख झालेलं की, त्यानंतर कणभर दुःखही मला सहन होणार नाही. त्याच्यासोबत त्याने मला इतकं सुख दिलं की त्यापेक्षा कणभर कमी सुखही मला चालणार नाही. मी स्वतंत्र्य आहे. स्वत:ची काम स्वत: करते. पैसे कमावते, अभिनय करते. माझ्याकडे सगळं काही आहे. मला मोहनची सवय आहे म्हणजे मला केअर टेकर हवा असतो. पण, तो कोणामध्येच मला दिसला नाही. माझ्यासोबत सखी होती. मी ३५ वर्षांची असताना मोहन सोडून गेला. तेव्हा माझं लग्नाचं वयही होतं. पण मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.”, असं शुभांगी गोखले म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात,  "लग्न न करण्याचं आणखी एक कारण म्हणजे सखी. तिला बहुतेक आता नाही कळणार किंवा कळलंही असेल. जर मी लग्न केलं असतं तर तिचं आयुष्य आतापेक्षा खूप बदललं असतं. मोहन गेला त्यावेळी ती ५ वर्षांची होती. मी दुसरं लग्न केलं असतं तर त्या माणसाने तिला कसं वागवलं असतं? तिला मोहनचीही नीट माहिती नव्हती. सखी अजूनही मला सांगते, तुला जोडीदाराची गरज आहे. लग्नाचा विचार कर. पण, मोहनची झलक मला दुसऱ्या कोणामध्ये दिसली नाही. आणि, आता कशासाठी लग्न करायचं? चल गोव्याला जाऊ एकत्र असं काही मला कोणाला म्हणायचं नाहीये. माझं सगळं जग फिरुन झालंय. मुळात आता हे वय लग्नाचं आहे असं मला वाटत नाही."

दरम्यान, शुभांगी गोखले मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांनी  मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. एका लग्नाची तिसरी गोष्ट, श्रीयुत गंगाधर टिपरे, काहे दिया परदेस, राजा रानीची गं जोडी, येऊ कशी तशी मी नांदायला या गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :सखी गोखलेटेलिव्हिजनसिनेमासेलिब्रिटी