Join us  

“रमेश देव नशीबवान”, हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, “सीमासारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 2:37 PM

Seema Deo Passed Away : “मागच्या वर्षी रमेश देव गेले आणि आज...”, सीमा देव यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची पोस्ट, शेअर केली खास आठवण

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना अल्झायमरने ग्रासलं होतं. मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सीमा देव यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने सीमा देव यांची एक आठवण शेअर केली आहे.

सीमा देव यांच्या निधनानंतर हेमांगीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टमधून हेमांगीने तिच्या बालपणीचा किस्सा शेअर केला आहे.

६२व्या वाढदिवशी ६२ तोळ्याची सोन्याची माळ; रमेश देव यांनी पत्नी सीमा यांना दिलेलं खास गिफ्ट, तुम्हाला माहितीये का किस्सा?

हेमांगीची पोस्टमधून सीमा देव यांना आदरांजली

लहानपणी दूरदर्शनवर ‘सुवासिनी’ लागला होता. अभ्यास संपवून मी जेव्हा बाहेरच्या खोलीत आले (तेव्हा १ रूम किचन मोठी गोष्ट होती) त्यातलं ‘ह्रदयी प्रीत जागते’ गाणं सुरू होतं! एक अतिशय सालस, सोज्वळ, सुसंस्कृत, सादगी से भरा, गोड चेहरा मी पाहीला. मी लगेच बाबांना विचारलं “ही कोण पप्पा?” (आपण सर्रास पडद्यावर दिसणाऱ्या लोकांना अरे, तु रे करूनच संबोधतो, वयात कितीही अंतर असलं तरी) तर पप्पा म्हणाले “सीमा”! मी म्हणाले “पप्पा किती सुंदर दिसते ओ ही!” मला चित्रांची आवड असल्यामुळे पुढे म्हटलं “बाईचा perfect चेहरा!” त्यावर पप्पा म्हणाले “हो न अगदी बायको मटेरियल!” भाजी निवडता निवडता मम्मीने पप्पांकडे पाहीलं त्यावर ते म्हणाले “एकदम तुझ्या मम्मीसारखा!” पप्पा वाचले.

 

Jokes apart… पण तेव्हा खरंच जगाच्या पाठीवर, या सुखांनो या, मोलकरीण, आनंद मधल्या सीमा सारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं प्रत्येक पुरूषाला वाटत असणार! रमेश देव नशीबवान! पण ते ही तेवढेच देखणे! म्हणजे प्रत्येक बाईच्या ‘Husband Material’ मध्ये चपखल बसणारा चेहरा! दोघांची जोडी तर म्हणजे रब ने बना दी जोडीच जणू! मागच्या वर्षी रमेश देव गेले… आज सीमा देव! 💔खरे जोडीदार एकमेकांशिवाय फार कळ वेगळे राहू शकत नाहीत हेच खरं!

सीमा देव यांनी एका चित्रपटात खलनायिकेची भूमिका केली होती. कमाल अभिनय. त्यांच्या सोज्वळ, गोड characters पेक्षा अतिशय वेगळा! म्हणजे अशा चेहऱ्याची बाई असं ही वागू शकते बरं का याचं ते उत्तम उदाहरण! कुणाला त्या चित्रपटाचं नाव आठवत असेल तर please सांगा! मला भयंकर आवडलं होतं ते काम!

सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. १९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटातून त्यांनी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांनी भूमिका साकारलेले ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. 'आनंद' या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.

"तुझ्या मांडीवर शेवटचा श्वास सोडावा", रमेश देव असं म्हणताच सीमा देव झालेल्या भावुक

सीमा देव यांनी दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. २०१३ साली त्यांनी मोठ्या उत्साहात लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. कलाविश्वातील त्यांची जोडी सुपरहिट होती. ‘एव्हरग्रीन लव्ह स्टोरी’ म्हणून त्यांच्या लव्हस्टोरीकडे पाहिलं जायचं. त्या दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र स्क्रीन शेअर केली होती. रमेश देव यांचं फेब्रुवारी २०२२मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सीमा देव व रमेश देव यांची अजिंक्य व अभिनय ही मुलेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.

टॅग्स :रमेश देवअजिंक्य देवहेमांगी कवीमराठी अभिनेतामराठी चित्रपट