Hruta Durgule Post: हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यावरील दुर्वा, फुलपाखरू यांसारख्या मालिकांमधून काम करत ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. नाटक, मालिका तसेच चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्रीचा दांडगा वावर आहे. दरम्यान, हृता सध्या चर्चेत आली आहे. हृता दुर्गुळेचा पती प्रतीक शाहचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर तिने नवऱ्यासोबतचा एक रोमॅंटिक फोटो पोस्ट केलाय. या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर काम व वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणांचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. हृताने १८ मे २०२२ ला प्रतिक शाहशी लग्न केलं होतं. हे जोडपं चाहत्यांचं लाडकं जोडपं आहे. हृता-प्रतीकच्या सुखी संसाराला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आज लाडक्या नवरोबाच्या वाढदिवस अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे प्रतीकला रोमॅंटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हृताने पती प्रतीकसोबतचा एक खास फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर कॅप्शमध्ये तिने लिहिलंय की, "मिस्टर शाह तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! कधी कधी मी मोठमोठ्याने हसत राहते, तर कधी रडतेही हे फक्त तुझ्यामुळेच. तुझं प्रेम, जिव्हाळा आणि दयाळूपणाचं आता हे आणखी एक वर्ष. या सगळ्यामुळे मी स्वत: ला खूप भाग्यवान समजते. आयुष्याच्या प्रत्येक पाऊलावर मी तुझ्यासोबत आहे."
हृता नुकतीच 'कन्नी' या सिनेमात दिसली होती. तर प्रतीक शाह गुजराती असून त्याने अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये 'कुछ रंग प्यार के ऐसे भी','बहु बेगम','बेहद २','एक दिवाना था' या मालिकांचा समावेश आहे. तर त्याची आई देखील हिंदी मालिकांमध्ये अभिनय करते.