'मुफासा: द लायन किंग' या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'द लायन किंग' या सिनेमाचा हा प्रीक्वल आहे. अलिकडेच या अॅनिमेटेड सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, मराठी अभिनेत्याने मात्र सिनेमाचं पोस्टर पाहून संताप व्यक्त केला आहे.
'मुफासा: द लायन किंग' सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी शाहरुख खानबरोबर त्याचा लेक आर्यन खान आणि छोट्या अबरामनेही आवाज दिला आहे. शाहरुखने मुफासा या मुख्य भूमिकेचं हिंदीत डबिंग केलं आहे. तर आर्यनने मुफासाचा मुलगा सिंबा आणि अबरामने तरुण मुफासाचं रेकॉर्डिंग केलं आहे. या सिनेमासाठी शाहरुख आणि त्याच्या लेकांबरोबरच श्रेयस तळपदे, मकरंद देशपांडे, संजय मिश्रा, मियांग चांग या कलाकारांनीही आवाज दिले आहेत. मात्र 'मुफासा: द लायन किंग' सिनेमाच्या एका ठिकाणी लावलेल्या पोस्टरवर शाहरुख, आर्यन आणि अबराम यांची नावं बोल्डमध्ये मोठ्या अक्षरात लिहिण्यात आली आहेत. तर इतर कलाकारांची नावं छोट्या अक्षरात लिहिली गेली आहेत.
मकरंद देशपांडे, श्रेयस तळपदे, संजय मिश्रा या दिग्गजांची छोट्या फॉन्टमधील नावं पाहून मराठी अभिनेता सौरभ चौघुलेने संताप व्यक्त केला आहे. सौरभने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. "शाहरुख खान समजू शकतो...पण आर्यन खान आणि अबराम खान यांची नावं बोल्डमध्ये का? बाकी दिग्गज मकरंद देशपांडे, संजय मिश्रा, श्रेयस तळपदे यांची नावं अशी सेकंडरी लिहायचं किती चुकीचं आहे? नक्कीच या सगळ्यांचं फिल्म इंडस्ट्रीसाठीचं योगदान आर्यन खान आणि अबराम खान यांच्यापेक्षा जास्तच आहे", असं सौरभने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अॅनिमेशन चित्रपट 'द लायन किंग' हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर २०१९ मध्ये या चित्रपटाचा रीमेक बनवण्यात आला. आता तब्बल ५ वर्षांनंतर त्याचा प्रीक्वल येणार आहे. तर या प्रीक्वलचं नाव 'मुफासा: द लायन किंग' असं ठेवण्यात आलं आहे. हा सिनेमा २० डिसेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे.