Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 14:16 IST

किरण माने यांनी वसीम बरेलवींचा शेर ट्वीट करून पोस्टची सुरुवात केली. 

बिग बॉस मराठी शोमधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता म्हणजे किरण माने. उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे किरण माने कायम चर्चेत येत असतात. किरण माने कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. पोस्टद्वारे सामाजिक विषयांवर किंवा कलाक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर परखडपणे आपलं मत मांडत असतात. यावेळीही त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

वसीम बरेलवी हे एक सुप्रसिद्ध कवी आहेत.  किरण माने यांनी वसीम बरेलवींचा शेर ट्वीट करून पोस्टची सुरुवात केली. 

...'जवान'मध्ये शाहरूखच्या आवाजात एक सनसनीत शेर हाय,"उसूलों पे जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है...जो ज़िन्दा हों, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है !"

...हा शेर आजच्या परिस्थितीत लै लै लै मोलाचा संदेश देऊन जातो भावांनो. जवा-जवा आपल्यावर दडपशाहीचं सावट येतं... आपल्या पूर्वजांनी झगडून, लढा देऊन मिळवलेलं, आपलं व्यक्त होन्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं... आपल्यावर पिढ्या न् पिढ्या असलेल्या मानवतेच्या, समानतेच्या, बंधुभावाच्या संस्कारांवर घाला घातला जातो... तवा बिनधास्त नडायला पायजे, भिडायला पायजे... 'टकराना ज़रूरी है' ! तोच आपल्या जिवंत असल्याचा पुरावा असतो. नायतर सगळं सहन करत, मुकाट जगनं मुडद्यापेक्षा बदतर असतं !

पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलं की, ...शायरीच्या दुनियेत बेताज बाहशाह असलेल्या वसीम बरेलवींचा एक दिवस फोन वाजला, "हॅलो, वसीमजी, मी शाहरूख खान बोलतोय. तुमचा हा शेर मला कायम प्रेरणा देतो. यावेळी तो माझ्या सिनेमात वापरायला मला तुमची परवानगी हवीय." वसीमभाई म्हन्ले,"शाहरूख बेटा, तू मला आवडतोस. परवानगी देईन, पण एका अटीवर. हा शेर मी लिहून देईन, तसाच्या तसा सिनेमात तू तुझ्या आवाजात म्हणायचास." शाहरूखनं नम्रपणे हसून होकार दिला. दोन ओळींसाठी एवढा मोठ्ठा कलाकार स्वत: फोन करून विनयशीलतेनं परवानगी मागतो याचं बरेलवींना लैच नवल वाटलं.

...खरंतर ज्यांना शाहरूखचं अफाट वाचन, तिक्ष्ण बुद्धीमत्ता, विवेकी विचारसरणी, समाजभान याविषयी माहिती आहे, त्यांना या गोष्टीचं लै नवल वाटनार नाय. असे कलावंतच न डरता, मागे न हटता, पाठीचा कणा ताठ ठेवून जगतात.

पुढे माने पोस्टमध्ये म्हणतात,  नायतर बाकी आज आपल्या सिनेमाक्षेत्रात बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत वो. फायद्यासाठी व्यवस्थेचे पाय चाटत लाचार जगनार्‍या... जातीधर्मांत द्वेषाचं विष पसरेल असा इतिहासाचा विपर्यास करनारे सिनेमे काढनार्‍या... भ्रष्ट नेत्यांकडून फंडिंग उकळत प्रोपोगंडा फिल्मस् काढनार्‍या सुमार दर्जाच्या कलाकारांची मराठी-हिंदीत सद्दी आहे. अशा नट-दिग्दर्शकांची ठरवून 'हाईप' केली जाते. पात्रता नसताना अनेक सरकारी पुरस्कार, पदं देऊन प्रेक्षकांवर लादलं जातं. हे पाहून कवा-कवा निराशा यायची. अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत? असा प्रश्न पडायचा...

पन प्रेक्षक येडे नसतात. पितळ आनि सोनं, काच आनि हिरा यातला फरक कळतो त्यांना... म्हनूनच त्यांनी 'जवान'ला ठरवून डोक्यावर घेतलं. शाहरूख खान नांवाच्या अस्सल भारतीय कलावंताला भरभरून प्रेम देऊन प्रेक्षकांनी हे दाखवून दिलं की, बास झालं आता. आम्हाला मूर्ख समजू नका... 'हम ज़िन्दा है... और ज़िन्दा नज़र आना चाहते है !, असं किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटलं. 

किरण माने यांनी यापुर्वीही अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटावर दोन पोस्ट केल्या होत्या. यात त्यांनी 'जवान' चित्रपटाचे आणि शाहरुख खानचे भरभरून कौतूक केले होते. किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आपल्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने वैभवाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे. अभिनेते किरण माने सध्या ‘सिंधुताई माझी आई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

टॅग्स :किरण मानेमराठी अभिनेताशाहरुख खानजवान चित्रपट