बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर गेल्या अनेक महिन्यांपासून मराठी मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. अक्षयला आपण विविध मालिकांमध्ये, शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय करताना पाहिलंय. अक्षयने बिग बॉस मराठीमध्ये असताना त्याची गर्लफ्रेंड रमाचा खुलासा केला होता. परंतु बिग बॉस संपून इतकी वर्ष झाली तरीही अक्षयने रमा नेमकी कोण? ती काय करते? याबद्दल सांगितलं नव्हतं. अखेर अक्षयने सोशल मीडियावर रमाचा खास व्हिडीओ शेअर करत प्रेमाची कबुली दिली.
अक्षयने दाखवला रमाचा चेहरा
अक्षयने काल सोशल मीडियावर रमाचा चेहरा दाखवला. मारवा गाण्याचा वापर करत अक्षयने रमासोबतचा खास रोमँटिक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करुन अक्षय लिहितो की, "तर ही माझी रमा… उद्या आम्हाला १० वर्ष पूर्ण होतायत … म्हंटल एक दिवस आधीच सांगाव .. म्हणून … बापरे, फाइनली सांगतोय मी … पण काहीही झाल तरी i love you मी फक्त तुमचाच आहे... आणि आता आम्हीही."
अक्षयची रमा काम काय करते?
रमाचं मूळ नाव साधना काकतकर आहे. साधना ही गीतकार आणि गायिका आहे. साधनाने गायलेली आणि लिहिलेली गाणी सोशल मीडिया आणि यूट्युबवर प्रसिद्ध आहेत. साधनाने सावनी रवींद्र, मंगेश बोरगावकर अशा अनेक लोकप्रिय गायकांसोबत काम केलंय. साधना आणि अक्षय दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही बोललं जातंय. दरम्यान साधना आणि अक्षयची खास जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय हे निश्चित