Indian Idol 15 Winner: टीव्हीवरील लोकप्रिय म्युझिक शो 'इंडियन आयडॉल' (Indian Idol 15) च्या १५ व्या पर्वाचा काल ६ एप्रिल रोजी ग्रँड फिनाले पार पडला. मानसी घोषने (Manasi Ghosh) यंदा इंडियन आयडॉलची विजेती ठरली. स्नेहा शंकर, सुभजीत चक्रवर्ती, अनिरुद्ध सुस्वरम, प्रियांशु दत्ता आणि चैतन्य देवधे या पाच स्पर्धकांना मागे टाकत मानसीने ट्रॉफी नावावर केली. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या मानसीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
'इंडियन आयडॉल' मुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून उत्तम गाणाऱ्यांना व्यासपीठ मिळतं. यंदाचा शोचं १५ वं पर्व होतं. सर्वच स्पर्धक एकापेक्षा एक होते. त्यांच्यात २४ वर्षीय मानसी घोषने बाजी मारली.आपल्या हटके सिंगिंग स्टाईलने तिने परीक्षकांचं आणि रसिकांचंही मन जिंकलं. यावेळी बादशाह, श्रेया घोषाल आणि विशाल ददलानी हे शोमध्ये परीक्षक होते. तर फिनालेच्या दिवशी मीका सिंह, शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडन यांनीही पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. आदित्य नाराणयने सूत्रसंचालन केलं. ९० च्या दशकातील गाण्यांनी फिनाले दुमदुमला. मानसीनंतर स्नेहा शंकर दुसऱ्या क्रमांकावर राहत रनर अप ठरली.
मानसीला किती मिळालं बक्षीस?
पश्चिम बंगालच्या मानसी घोषची विजेती म्हणून घोषणा झाल्यानंतर तिला आयडॉलची ट्रॉफी तर मिळाली. शिवाय १५ लाख रुपये प्राईज मनीही मिळाली. तसंच एक कारही प्राईजमध्ये मिळाली. "मला विश्वास बसत नाहीए की मी ट्रॉफी जिंकली. आई, बाबा, माझे गुरु, परीक्षक, आणि प्रेक्षकांचं मला खूप प्रेम मिळालं. मी हा आनंद शब्दात व्यक्त करु शकत नाही, धन्यवाद." अशी तिने प्रतिक्रिया दिली.
स्नेहा शंकरचंही उजळलं नशीब
शोची रनर अप ठरलेली स्नेहा शंकर विजेती झाली नसली तरी तिला ५ लाख रुपयांचं कॅश प्राईज मिळालं. इतकंच नाही तर १९ वर्षीय स्नेहाने आपल्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. त्यामुळे आता टीसीरिजसोबत ती काम करणार आहे. टीसीरिजने तिच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला आहे.