Join us

‘सूर नवा ध्यास नवा’ मध्ये रंगली महेश काळे-राहुल देशपांडे यांची जुगलबंदी, पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 07:15 IST

महेश काळे आणि राहुल यांची जुगलबंदी सुरू होताच सगळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

ठळक मुद्दे ‘सुरत पिया की’ यावर त्यांनी जुगलबंदी सादर करून सगळ्यांची मने जिंकली. राहुल देशपांडे यांनी सुर से सजी हे गाणे देखील सादर करून कार्यक्रमात वेगळे रंग भरले.

सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर प्रेक्षकांना अनेकदा महेश काळे यांनी सादर केलेल्या गाण्याचा नजराणा मिळाला आहे. त्यांच्या गायिकेने आपल्याला अनेकदा सुखद अनुभव दिला आहे. पण येत्या आठवड्यामध्ये मात्र सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर रंगणार आहे शास्त्रीय सुरांची खास जुगलबंदी. कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर शास्त्रीय संगीतातील दोन हिर्‍यांची ओळख महाराष्ट्राला झाली. हे दोन गायक म्हणजे महेश काळे आणि राहुल देशपांडे. आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा राहुल देशपांडे गेली अनेक वर्ष समर्थपणे पुढे नेत आहेत. आपल्या गायकीमधील नवनवीन गोष्टी तो प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात वा भारतातच नव्हे तर विदेशातसुद्धा आपल्या शास्त्रीय कलेचे प्रयोग सादर करून महेश काळे जगभारतील रसिक प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. या दोघांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर तरुण पिढीला शास्त्रीय संगीताकडे खेचून आणण्याची किमया करून दाखविली आहे आणि आता हे दोन दिग्गज प्रथमच सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर एकत्र दिसणार आहेत. कार्यक्रमात त्यांची जुगलबंदी रंगणार आहे, गप्पा रंगणार आहेत, ते काही अनुभव, अनेक अविस्मरणीय आठवणी प्रेक्षकांना सांगणार आहेत. 

 महेश काळे आणि राहुल यांची जुगलबंदी सुरू होताच सगळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. ‘सुरत पिया की’ यावर त्यांनी जुगलबंदी सादर करून सगळ्यांची मने जिंकली. राहुल देशपांडे यांनी सुर से सजी हे गाणे देखील सादर करून कार्यक्रमात वेगळे रंग भरले.

आपल्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी शैली निवडून आणि ती तेवढ्याच उत्तम पद्धतीने सादर करून स्पर्धकांनी आपल्या कॅप्टनसची आणि राहुल देशपांडे यांची मनं जिंकले. तसेच या आठवड्यात मानाची सुवर्ण कट्यार कुणाला मिळणार हे प्रेक्षकांना या भागातच कळेल.

टॅग्स :सूर नवा ध्यास नवामहेश काळेराहुल देशपांडे