Join us  

'दुर्दैव'... महाराष्ट्रात 'केरल स्टोरी'चा मोफत शो दाखवणारे नेते लक्ष्य, दिग्दर्शक केदार शिंदेंची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 11:36 AM

महाराष्ट्रात काही ठिकाणी राजकीय तसेच विविध संघटनांकडून ‘द केरला स्टोरी’चे मोफत शो आयोजित करण्यात येत आहेत.

मुंबई - बॉलिवूड चित्रपट 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) ला विरोध आणि समर्थन होत असून या चित्रपटाची आता सोशल मीडियावरही चर्चा होतेय. काही राज्यांमध्ये फिल्मला पाठिंबा मिळतोय तर काही राज्यांत विरोध होतोय. दरम्यान तमिळनाडूमध्ये चित्रपटाची स्क्रीनिंग थांबवण्यात आलं होतं. तर, महाराष्ट्रातील भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या चित्रपटाचे मोफत स्क्रिनिंग ठेऊन चित्रपटाला समर्थन दर्शवल. त्यामुळे, आता मराठमोठे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नाव न घेता अतुल भातखळकर यांना लक्ष्य केलंय. 

महाराष्ट्रात काही ठिकाणी राजकीय तसेच विविध संघटनांकडून ‘द केरला स्टोरी’चे मोफत शो आयोजित करण्यात येत आहेत. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही चित्रपटाच्या एका खास शोचे आयोजन ७ मे रोजी कांदिवलीतील एका थेअटरमध्ये केले होते. लव्ह जिहादचा बुरखा फाडणारच... असे म्हणत त्यांनी या शोचे मोफत आयोजन केले होते. आता मराठमोळा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नाव न घेता, शाहीर साबळे यांच्यावरील चरित्रपटाची आठवण नेतेमंडळींना करुन दिलीय. केदार शिंदे यांनी महाराष्ट्राचा शाहीर चित्रपटाकडे नेतेमंडळींचं लक्ष नसल्याची खंत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 

“दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?”, असे म्हणत एकप्रकारे अतुल भातखळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. यासह शिंदेंनी चित्रपटाचा ट्रेलरही शेअर केला आहे. 

दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौत तसेच मराठी अभिनेते शरद पोंक्षे अशा काही कलाकारांनीही केरला स्टोरी चित्रपटाचं समर्थन करत यावर भाष्य केलं आहे. आता दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाबद्दल भाष्य करताना एक खंत व्यक्त केली आहे.

काय आहे चित्रपटाची कथा

द केरला स्टोरी’ ची कथा केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे. सिनेमाचं कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. महिलांचे धर्मांतर करून त्यांना इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी कशा प्रकारे ब्रेनवॉश केले जाते याचे सत्य समोर आणणारा हा चित्रपट आहे. ‘द केरला स्टोरी’ चे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आह. अदा शर्माने चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

चेन्नईत मल्टिप्लेक्स मालकांनी घेतला निर्णय 

'द केरळ स्टोरी' चित्रपटा विरोधात चेन्नईत निदर्शन झालं. सिनेमाच्या निर्माते, कलाकार आणि दिग्दर्शकाविरोधात तमिलर पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्कायवॉक मॉलजवळ विरोध प्रदर्शन केले. हे बघताच सुरक्षेच्या कारणास्तव थिएटर मालकांनी स्क्रीनिंग थांबवलं होतं. 

टॅग्स :सिनेमाकेदार शिंदेभाजपाअतुल भातखळकर