'लापता लेडीज' सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. हा सिनेमा २०२४ मधील महत्वपूर्ण सिनेमा म्हणून ओळखला गेला. इतकंच नव्हे तर भारतातर्फे हा सिनेमा ऑस्करलाही पाठवण्यात आला होता. परंतु सिनेमाला ऑस्करमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. 'लापता लेडीज' सिनेमात सर्व नवखे कलाकार असूनही त्यांच्या अभिनयाने सिनेमाला चार चाँद लागले. 'लापता लेडीज' सिनेमात फूल कुमारीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नितांशी गोयलने 'लापता लेडीज'च्या सेटवरचा भावुक किस्सा सांगितला.
'लापता लेडीज'मधील या सीन वेळेस सर्वजण झालेले भावुक
फ्री प्रेस जर्नलशी बोलताना नितांशी गोयल म्हणाली की, सिनेमातील एक सीन स्क्रीप्टचा भाग नव्हता. परंतु नितांशीने स्वतः कल्पना दिल्याने हा सीन सिनेमात रचण्यात आला. तो म्हणजे जेव्हा फूल कुमारी रेल्वे स्टेशनमधील शौचालयात रडते. फूल कुमारीची व्यक्तिरेखा मनातून किती खचलीय हे दाखवण्यासाठी हा सीन गरजेचा होता. स्वतः नितांशीने सांगितल्याप्रमाणे दिग्दर्शक किरण रावने स्क्रीप्टमध्ये थोडा बदल करुन हा सीन शूट केला.
नितांशीने उत्कट अभिनय करुन हा इमोशनल सीन खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केला. या सीननंतर 'लापता लेडीज'ची संपूर्ण टीम इमोशनल झाली होती. सेटवर उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून नितांशीचं स्वागत केलं. अनेकजणांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. स्वतः दिग्दर्शक किरण रावच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते. 'लापता लेडीज' हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्स या ओटीटीवर रिलीज झाला असून सिनेमाला जगभरातील प्रेक्षकांनी प्रेम दिलं.