Join us  

'ते जनरल वॉर्डमध्ये होते आणि...'; वडिलांच्या उपचारासाठी नाना पाटेकरांकडे नव्हते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 3:33 PM

Nana Patekar: वडिलांच्या आठवणीत भावूक झालेल्या नाना पाटेकरांनी त्यांच्या वडिलांच्या आजारपणाचा किस्सा शेअर केला.

आपल्या दर्जेदार अभिनयातून कायम प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा अभिनेता म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar). कधी गंभीर तर, कधी विनोदी अशा कितीतरी भूमिका साकारुन नाना पाटेकरांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणाऱ्या नानांनी खऱ्या आयुष्यात बराच स्ट्रगल केला आहे. इतकंच नाही तर वडिलांच्या उपचारासाठी त्यांच्याकडे साधे पैसे सुद्धा नव्हते. इतकं हालाखीचं जीवन त्यांनी जगलं आहे. याविषयी त्यांनी कोण होणार करोडपती ( Kon Honaar Crorepati) या कार्यक्रमामध्ये सांगितलं.

कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या कर्मवीर स्पेशल या भागात मध्यंतरी नाना पाटेकरांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमात सूत्रसंचालक सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांच्याशी संवाद साधत असताना नानांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी वडिलांविषयी बोलत असताना ते भावूक झाले.

‘मी आज नट आहे पण माझ्या वडिलांना म्हणजेच आमच्या काकांना नाटक आणि सिनेमावर खूप प्रेम होतं. एक बाप मुलाला घेऊन तमाशाला जातो, हे ऐकायला विचित्र वाटेल. पण माझे वडील मला तमाशाला घेऊन जायचे. तू चल,त्या कलाकारांचा अभिनय पाहा, असं ते कौतुकाने म्हणायचे आणि मला सोबत न्यायचे. वडील आजारी होते, त्या त्यांच्या शेवटच्या दिवसांत माझी परिस्थिती फारशी चांगली नव्हती.  दुर्दैवानं आपल्या नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला, असं नाना पाटेकर म्हणाले.

पुढे ते म्हणतात, " माझ्याकडे त्यावेळी वडिलांच्या औषधालाही पैसे नव्हते. मंगेश आणि मी केईएम हॉस्पिटलच्या बाहेर एका दुकानाच्या पायरीवर बसलो होतो आणि माझे वडील आतमध्ये जनरल वॉर्डमध्ये होते.दरम्यान, या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी त्यांच्या वडिलांविषयी अनेक आठवणी सांगितल्या. नाना पाटेकर मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेता असून त्यांनी

बॉलिवूडमध्येही अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. उत्तम अभिनयाच्या जोरावर आज नानांनी अफाट मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. 

टॅग्स :नाना पाटेकरसचिन खेडेकरटेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमा