Join us  

भांडण, तंटा अन् पोलिसात गेला होता वाद, आता दोघांचाही एकमेकांच्या हातात हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 8:50 PM

निशा रावलच्या जखमा पाहून निशाचे इंडस्ट्रीतल्या मित्र मंडळींनीही करण मेहरावर टीका केली होती. रामायण मालिकेत सीता भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी देखील करणवर संताप व्यक्त केला होता.

टीव्हीचे प्रसिद्ध कपल करण मेहरा आणि निशा रावल गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत होते. घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली पत्नी निशा रावलने करण मेहराची पोलिसांत तक्रारही केली होती. एक रात्र करण मेहराला जेलची हवाही खावी लागली होती. निशा रावलने तिच्यासोबत करणने कशारितीने वागणूक दिली हे मीडियाला सांगत करण मेहरावर धक्कादायक आरोप केले होते.

घरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही करण तिला मारायचा निशाला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. त्यावेळी करणचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असूनही तिने यावर काहीही न बोलता सहन केलं. या सा-याने परिसीमा गाठल्यानंतर तिने त्या नात्यातून बाहेर येण्याचा निर्णय घेतल्याचे तिने मीडियाला सांगितले होते.

घटस्फोटानंतरच्या पोटगी बाबबत त्यांच्यात चर्चा सुरू होती.निशाने करणच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली असून त्यांना धमकावल्यचा आरोप करणने केला होता. निशाने पोटगीसाठी मोठी रक्कम मागितल्याने इतकी मोठी रक्कम देणे त्याला शक्य नव्हते. 

निशा रावलच्या जखमा पाहून निशाचे इंडस्ट्रीतल्या मित्र मंडळींनीही करण मेहरावर टीका केली होती. रामायण मालिकेत सीता भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी देखील करणवर संताप व्यक्त केला होता. “निशाला नक्कीच मारहाण झाली आहे. तिच्या शरीरावरील जखमा हा त्याचा पुरावा आहे. या अत्याचारामुळं ती मानसिकरित्या खचली आहे.

खरं तर तिनं या पूर्वीच आवाज उठवायला हवा होता. तसं केलं असतं तर तिला हात लावण्याची हिंमत देखील करण करु शकला नसता. पण आता तिनं घाबरु नये. या लढाईत मी तिच्यासोबत आहे.” असं म्हणत दीपिका यांनी निशाची बाजू घेतली होती आणि करणबाबत आपला राग व्यक्त केला होता.  

आता निशा रावलने तिचा निर्णय बदलत पुन्हा पती करणसह राहण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आलंय. झालेला सगळा वाद विसरुन सगळं काही सुरळीत होण्यासाठी निशा प्रयत्न करत आहे. एका नामांकित प्रोडक्शन हाऊसच्या बाहेर दोघांनाही मीडियाने एकत्र कॅप्चर केले. या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनाही आनंद झाला मात्र याच फोटोमुळे त्यांना ट्रोलही करण्यात येत आहे. मग इतका तमाशा कशासाठी केला अशा प्रकारचे कमेंट्सही त्यांच्या या फोटोवर युजर्स देताना दिसत आहेत.

टॅग्स :करण मेहरा