२०२२ साली आलेला आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्डा' (Laal Singh Chaddha) सिनेमा जोरदार आपटला होता. आमिरला याचं खूप दु:ख झालं होतं. हॉलिवूडकडून सिनेमाचे हक्क विकत घेतल्यानंतर, अनेक वर्षांच्या रिसर्चनंतर त्याने हा सिनेमा बनवला होता. यात त्याला अनेक अडचणीही आल्या तरी त्यावर मात करत त्याने प्रेक्षकांसाठी सिनेमा आणला. परिणामी प्रेक्षकांनी मात्र सिनेमाकडे पाठ फिरवली. त्या दिवसापासून आमिरने कामातून थेट ब्रेकच घेतला. त्यानंतर त्याचा एकही सिनेमा आलेला नाही. आमिरचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) सध्या सिनेसृष्टीत नशीब आजमावत आहे. 'लाल सिंह चड्डा'च्या अपयशावर जुनैद काय म्हणाला वाचा.
जुनैद खानचा नुकताच 'लव्हयापा' सिनेमा रिलीज झाला आहे. यामध्ये तो खुशी कपूरसोबत दिसत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने जुनैदने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखती दिली. यावेळी 'लाल सिंह चड्डा'चाही विषय निघाला. सिनेमाच्या अपयशावर जुनैद म्हणाला, "त्यांनी खूप प्रेमाने सिनेमा बनवला होता. पण तो नाही चालला. प्रत्येक सिनेमाचं नशीब असतं. सिनेमा कसा यशस्वी करायचा हे जर माहित असतं तर सगळेच सिनेमे चालले असते. मला तर लाल सिंह चड्डा खूप आवडला होता. पण काय करणार प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं."
अपयशावर आमिर तुझ्याशी बोलतो का? यावर जुनैद म्हणाला, "हो, ते माझ्याशी सगळं शेअर करतात. संवाद साधतात. लाल सिंह चड्डा फ्लॉप झाल्यावर त्यांनी माझ्याशी संवाद साधला होता. तसंच त्यांनी प्रेक्षकांचा कौलही स्वीकारला."
आमिर खानने 'लाल सिंह चड्डा'साठी प्रचंड मेहनत घेतली होती. सिनेमात त्याच्यासोबत करीना कपूरही होती. शूटदरम्यान करीना दुसऱ्यांदा गरोदर राहिली. त्यामुळे डिलीव्हरीनंतर ती परत शूटला येईपर्यंत आमिर थांबला होता. अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सिनेमाची पटकथा लिहिली होती.