Join us  

अभिनेत्री जया बच्चन यांनी राज ठाकरेंशी घेतला होता पंगा, म्हणाल्या होत्या कोण आहेत राज ठाकरे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 9:38 AM

बाॅलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

बाॅलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.  जया बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत. जया या त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. आज 9 एप्रिल रोजी जया बच्चन आपला 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या केवळ सिनेमासाठीच नव्हे तर त्यांच्या राजकीय प्रवासासाठीही ओळखल्या जातात. पण तुम्हाला माहितेय की बॉलिवूडच्या त्या अशा एकट्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी राज ठाकरे यांच्याशी पंगा घेतला होता. नेमकं काय घडलं होतं, हे आपण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया.

एक काळ असा होता की राज ठाकरे आणि जया बच्चन हे आमनेसामने आले होते. तर झालं असं होतं की, 2008 मध्ये राज ठाकरे आणि अमिताब बच्चन यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. राज ठाकरे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करून आपला स्वतःचा पक्ष काढला. त्यानंतर मराठीचा अजेंडा हाती घेत राज यांनी उत्तर भारतीयांना लक्ष्य केले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी बच्चन यांचाही उल्लेख केला होता. बच्चन मुंबईत राहिले, मोठे झाले पण त्यांनी त्यांच्या राज्यात शाळा काढली असा हल्ला राज यांनी बच्चन यांच्यावर केला होता. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या खासदार असलेल्या जया बच्चन यांनीही राजला प्रत्युत्तर दिले होते.

जया या त्यावेळी समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार होत्या. आपला मुलगा अभिषेकच्या 'द्रोणा' या चित्रपटाच्या संगीताच्या सीडीच्या प्रकाशन कार्यक्रमात त्या म्हणाल्या, 'मला फक्त बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत. तर कुठल्याही ठाकरेंना मी ओळखत नाही. राज ठाकरे कोण आहेत? जर त्यांना वाटत असेल की, आम्ही महाराष्ट्रात कन्या शाळा काढावी तर राज ठाकरेंनी त्यांची कोहिनूर मिलची जागा आम्हाला द्यावी. आम्ही कन्याशाळा मुंबईत काढतो. त्यानंतर राज ठाकरेंनीही त्यांना उत्तर दिलं होतं. बराच काळ हा वाद चालला होता. त्यामुळे बच्चन कुटुंबिय आणि राज ठाकरे यांच्यात दरी वाढत गेली. अखेर मोठ्या मनाच्या बच्चन यांनी राज यांची माफी मागितल्याचं म्हटलं जातं. 

 वयाच्या 15 व्या वर्षी चित्रपटात प्रवेश करणाऱ्या जया बच्चन यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2004 मध्ये जया यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यांना यशही मिळाले. जया गेल्या 20 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. चार वेळा राज्यसभा खासदार राहिलेल्या जया बच्चन आणि त्यांचे पती अमिताभ बच्चन यांच्याकडे एकूण 1578 कोटी रुपयांची संपत्ती आहे. जया बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. 

टॅग्स :जया बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूडराज ठाकरे