Join us

जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:59 IST

'या' कारणामुळे जयदीप अहलावतच्या हातून निसटला 'रामायण'सारखा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट

ओटीटी विश्वातील दमदार अभिनेता जयदीप अहलावत (Jaydeep Ahlawat) त्याच्या अनन्यासाधारण अभिनय कौशल्यामुळे ओळखला जातो. 'पाताल लोक' मधील त्याची 'हाथीराम'ची भूमिका सर्वांच्या मनात घर करुन आहे. एनएसडीमध्ये शिकलेला जयदीप सुरुवातीच्या संघर्षानंतर आता फिल्म इंडस्ट्रीत महत्वाचा चेहरा बनला आहे. लवकरच त्याचा 'ज्वेल थीफ' सिनेमा येणार आहे ज्यामध्ये सैफ अली खान, कुणाल रॉय कपूर यांची भूमिका आहे. दरम्यान जयदीपला नितेश तिवारींच्या 'रामायण' (Ramayan) या महत्वाकांक्षी सिनेमात काम करण्याचीही ऑफर मिळाली होती. मात्र त्याला ती नाकारावी लागली.

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल अशी तगडी स्टारकास्ट आहे. रणबीर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे आणि अभिनेता यश सिनेमात रावण आहे.  ईटाईम्स रिपोर्टनुसार, मेकर्सने जयदीप अहलावतला रावणाचा भाऊ बिभीषणच्या भूमिकेसाठी विचारलं होतं. ही आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी जयदीपही उत्सुक होता. मात्र तारखा न जुळल्याने आणि त्याचे अगोदरच काही प्रोफेशनल कमिटमेंट्स असल्याने त्याला ही भूमिका नाकारावी लागली. 

मेकर्सला या भूमिकेसाठी जयदीपलाच घ्यायचं होतं. बिभीषण या पात्राची रावणाचा भाऊ असूनही असलेली वेगळी भावनिक बाजू ही जयदीपच उत्तमरित्या साकारु शकतो अशी मेकर्सला आशा होती. म्हणूनच जयदीपलाच पहिलं प्राधान्य होतं. मात्र त्याच्या तारखा शेवटपर्यंत जुळून आल्या नाहीत. आता या भूमिकेसाठी मेकर्स कोणाला घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

'रामायण' सिनेमा दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग २०२६ साली आणि दुसरा २०२७ साली रिलीज होणार आहे. मुख्य स्टारकास्टशिवाय सिनेमात लारा दत्ता, रवी दुबे, आदिनाथ कोठारे, अजिंक्य देवसह इतरही कलाकारांच्या भूमिका आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीरामायणरणबीर कपूरबॉलिवूड