Join us

प्रेक्षकांनी स्वीकारणे महत्त्वाचे

By admin | Updated: September 25, 2016 03:24 IST

अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत.

अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत.‘मिर्झिया’ या तुझ्या पहिल्या चित्रपटाविषयी काय सांगशील?-माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मला दुहेरी भूमिका करायला मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच वेगळा होता. मिर्झिया या चित्रपटासाठी मी खूप कष्ट घेतले आहेत. तब्बल ३ वर्ष या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. शूटिंगदरम्यान बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागला. भौगोलिक वातावरणाशी जुळवून घेताना असंख्य अडचणी आल्या. लडाखमधील आॅक्सिजनची कमतरता, राजस्थानमधील वादळे या सगळ्यांना तोंड देत आम्ही चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. अनेकवेळा हॉटेल्स सेटपासून कित्येक किलोमीटर लांब असायची. चित्रीकरणाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप वेळ लागायचा तरीही मी हे सगळे एन्जॉय केले.अभिनेता बनण्याचा निर्णय कधी घेतलास?-मी सुरुवातीला स्क्रिप्ट रायटिंगचे काम केले. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्यासोबतही मी काम केले आहे. त्यानंतर मी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. हे सगळे शिकत असताना मी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. मी अनिल कपूर यांचा मुलगा जरी असलो तरी मला मेहनतीशिवाय पर्याय नाही हे आधीपासूनच माहिती होते. त्याप्रमाणे मी माझी मानसिक तयारीदेखील केली. तू या चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकला आहेस, हा अनुभव कसा होता? - मी यापूर्वी कधीही घोडेस्वारी केलेली नव्हती. तब्बल १८ महिने मी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत होतो. यावेळी अनेक वेळा मी पडलो, निराश झालो. काही केल्या मला घोडेस्वारी जमत नव्हती. त्यामुळे मला घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला पाठवण्यात आले. मी सहा आठवडे तिथे जाऊन प्रशिक्षण घेतले. मी रेसिडेन्ट स्टेबल बॉय म्हणूनदेखील तिथे काम केले. याचदरम्यान मी पोलो प्लेअर खेळाचेदेखील प्रशिक्षण घेतले.तू यानंतर ‘भावेश जोशी’ या चित्रपटात काम करणार आहेस. ‘मिर्झिया’ आणि 'भावेश जोशी'मध्ये काय वेगळेपण आहे?-राकेश मेहरा अत्यंत अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांचा प्रत्येक दिवस हा नवीन असतो. तर ‘भावेश जोशी’ या चित्रपटचा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी हा अत्यंत व्यावसायिक आहे. ज्यावेळी विक्रमने मला ‘भावेश जोशी’ या चित्रपटात काम करायची आॅफर दिली तेव्हा माझी मानसिक तयारी झाली नव्हती. ‘मिर्झिया’नंतर मात्र मी ‘भावेश जोशी’मध्ये काम करायला तयार झालो आहे. तुझ्या कुटुंबाच्या तुझ्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत, तुला वाटतेय का तू त्या पूर्ण करू शकशील?-माझे वडील मला नेहमी सांगतात तू काम करत राहा. व्यावसायिकतेबाबत फारसा विचार करू नकोस. तर माझी आई मला सांगते नेहमी सकारात्मक विचार कर, आणि प्रामाणिक राहा. मी चित्रपटसृष्टीत काम करत असताना या दोन्ही गोष्टी डोक्यात ठेवूनच काम करणार आहे. माझे काम लोकांना आवडले तरच मी टिकू शकेन याची मला कल्पना आहे. मला स्वीकारायचे की नाही हे सर्वस्वी लोकांवर अवलंबून आहे.

- janhavi.samant@lokmat.com