Join us  

अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदेंकडून खास अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 10:58 AM

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील अशोक सराफ यांच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच राज्याचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या पुरस्काराची घोषणा केली. सध्या सर्वस्तरावरून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.  दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील अशोक सराफ यांच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला.

केदार शिंदे यांनी लिहलं, 'अशोक सराफ ...म्हणजे आपले अशोक मामा, यांना "महाराष्ट्र भूषण" हा पुरस्कार काल जाहीर झाला. मराठी रसिकांची पोचपावती या निमित्ताने त्यांना मिळाली. कारण ते आहेतच महाराष्ट्र भूषण. आमच्या पिढीला विनोद आणि त्यांचं टायमिंग खऱ्या अर्थानं त्यांनी शिकवलं. विनोद हा नैसर्गिक असतो त्याला कुणाचा अपमान न करता सादर कसं करावं? हे त्यांचे संस्कार. आज सकाळी घरी जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या'.

ते आजही कला क्षेत्रात सक्रिय आहेत आणि मराठी चित्रपट, नाटकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. हा पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या अष्टपैलू अभिनयाचा आणि कामाचा उचित सन्मान आहे. आपल्या दमदार अभिनयाने गेली अनेक वर्ष रसिकांचं त्यांनी भरपूर मनोरंजन केलं. त्यांनी मराठीत जितकी व्हरायटी दिली तितकी कोणीच दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रभूषण देऊन राज्य सरकारने एका बहुरूपी कलाकाराचा सन्मान केला, अशी भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :केदार शिंदेसेलिब्रिटीअशोक सराफमहाराष्ट्र