सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने 'नादानियां' सिनेमातून पदार्पण केलं. तो दिसायला हुबेहूब सैफसारखाच असल्याने कायम त्याच्या लूकची चर्चा असते. इब्राहिमचा पहिलाच सिनेमे चांगलाच आपटला. सिनेमाला सर्वांनीच ट्रोल केलं पण इब्राहिम सिनेमात खूपच हँडसम दिसला असल्याने त्याचं कौतुक झालं. त्याच्याकडे आणखी काही सिनेमांच्या ऑफर्स आहेत. नुकतंच इब्राहिमने एका मुलाखतीत अनेक विषयांवर संवाद साधला. यावेळी आपल्या सावत्र भावांबद्दल तो काय म्हणाला वाचा.
इब्राहिम अली खानने नुकतीच 'फिल्मफेअर'ला मुलाखत दिली. यावेळी तो तैमूर आणि जेहबद्दल म्हणाला, "मी जेव्हा त्या दोघांना बघतो तेव्हा मला त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. तैमूर जो फक्त ८ वर्षांचा आहे तो घरातून बाहेर जायचा प्रयत्न करतो तर लगेच पापाराझी फोटो काढायला येतात. जेह तर अवघा ४ वर्षांचा आहे. त्याचेही फोटो घेतात. घरी असताना दोघंही या वयात आपल्या आयफोन आणि आयपॅडवर खेळत असतात. सारा आणि माझ्या लहानपणी असं नव्हतं."
तो पुढे म्हणाला, " मी लहान असताना गॅजेट्ससोबत खेळण्याऐवजी बाहेर जाऊन खेळायचो. मला वाटतं नॉर्मल लहानपण असणारी माझी शेवटची पिढी आहे. बरं झालं माझ्या लहानपणी स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही नव्हते. ओटीटी, आयफोन किंवा आयपॅड नव्हते. पापाराझी तर या मुलांना श्वासही घेऊ देत नाहीत. मी जेव्हा १८ वर्षांचा झालो तेव्हा मी त्यांच्यासमोर आलो. मला सामान्य बालपण मिळालं यासाठी मी खूप आभारी आहे."
सैफच्या चारही मुलांमध्ये चार-पाच वर्षांचं अंतर आहे. सारा अली खान सर्वात मोठी आहे. १९९५ साली तिचा जन्म झाला तर इब्राहिमचा जन्म २००१ साली झाली. तैमूरचा जन्म २०१६ साली झाला तर जेह २०२१ साली जन्माला आला.