Join us  

संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार?; अनेकांच्या मेसेजनंतर स्वत:च केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 4:15 PM

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लवकरच राजकारणात प्रवेश करणार अशा बातम्या विविध माध्यमांवर झळकत होत्या. त्यावर स्वत: संजय दत्तनेच सोशल मीडियावर खुलासा केला आहे.

मुंबई - Sanjay Dutt on Politics Entry ( Marathi News ) बॉलिवूड अभिनेता संजय दत्तबाबत मागील काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू आहे. संजय दत्तराजकारणात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं. मात्र या सर्व अफवा असून मी राजकारणात प्रवेश करणार नाही, पण कधी मला मनापासून राजकारणात यावं वाटेल तेव्हा मी स्वत: याची घोषणा करेन असा खुलासा संजय दत्तनं केला आहे. 

संजय दत्तनं सोशल मीडिया X वर पोस्ट केलंय की, मी राजकारणात येणार असल्याच्या सर्व अफवांना पूर्णविराम द्यायचा आहे. मी कुठल्या पक्षात सहभागी होत नाही, ना कुठलीही निवडणूक लढणार आहे. जर राजकीय क्षेत्रात मी पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला तर मी स्वत: यावर पहिली घोषणा करेन. त्यामुळे कृपा करून माझ्याबाबत ज्या काही बातम्या, अफवा सुरू आहेत त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन संजय दत्तनं केले आहे.

संजय दत्त राजकारणात येणार अशी अफवा याआधीही अनेकदा पसरली आहे. प्रत्येकवेळी संजय दत्तनं याबाबत खुलासा केला आहे. फ्रि प्रेस जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये संजय दत्त महाराष्ट्राचे मंत्री महादेव जानकर यांच्या रासप पक्षात येतील या दाव्याचे खंडन केले होते. संजय दत्तचे वडील सुनील दत्त हे काँग्रेस पक्षाकडून खासदार राहिले आहेत. त्यासोबत प्रिया दत्त या संजय दत्त यांच्या भगिनी यासुद्धा राजकारणात असून त्यादेखील काँग्रेसच्या खासदार होत्या. 

काही दिवसांपूर्वी कंगना रानौत आणि गोविंदा यांनीही राजकारणात प्रवेश केला. कंगना या हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सध्या भाजपानं मुंबईतल्या उत्तर मध्य जागेवर कुणीही उमेदवार दिला नाही. याठिकाणी पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या उमेदवारीची घोषणा अद्याप नाही. या जागेवर नवीन चेहरा दिला जाऊ शकतो असं बोललं जातं. त्यात संजय दत्तच्या राजकीय प्रवेशाबाबत अफवा सुरू झाल्या होत्या. त्यावर स्वत: संजय दत्तनं खुलासा केला आहे.  

टॅग्स :संजय दत्तगोविंदाराजकारणलोकसभा निवडणूक २०२४काँग्रेस