माझी अम्मी हैदराबादमध्ये लहानाची मोठी झाली. फातिमा तीचं नाव. ती एक कणखर आणि देखणी स्त्री होती. ती ऑक्सफर्डमध्ये शिकली होती आणि प्रथम श्रेणीची फौजदारी दंडाधिकारी होती. आयुष्यात बरंच काही कमावलेल्या काही पहिल्यावहिल्या मुस्लीम स्त्रियांमध्ये ती एक होती. माझे वडील कॅन्सरने आजारी असताना तिने अक्षरशः दिवसरात्र मेहनत करून महागड्या उपचारांचा आर्थिक बोजा तर उचललाच, पण आमच्या संगोपनातही कुठली कसर ठेवली नाही. माझ्या वडिलांच्या मृत्युनंतर डबघाईला आलेला आमचा कौटुंबिक व्यवसायही तिने टुकीने चालविला. मला वाटतं, माझा वर्कहोलिकनेस तिच्याकडूनच आलेला आहे.
अम्मीने माझ्या मांडीवरच प्राण सोडले. तो क्षण माझ्यासाठी सर्वांत जास्त वेदनादायी होता. ती अचानकच गेली. डायबिटिस असल्याने तिच्या पायाला झालेल्या जखमेचा संसर्ग पटकन रक्तात पसरला. ती यातून वाचणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, पण माझ्या मनाची तयारी होत नव्हती. त्यामुळे मी तिच्यापाशी जाऊन सतत तिच्याशी बोलत असे. काहीही करून ती वाचावी, यासाठी माझी ती वेडी धडपड होती. मी अम्मीला सांगितलं की, ती गेली, तर मी कधीही आनंदी राहणार नाही, मी वाईट माणूस बनेन, तिच्या मुलीशी वाईट वागेन, पण अम्मीच्या नजरेत मात्र मला सतत आनंदी भावच दिसत राहिले. मी तिच्याजवळ बसून रडत होतो आणि ती मला सांगत होती, ‘बेटा, मला आता जाऊ दे. मला विश्रांतीची गरज आहे.’
... आणि अम्मी गेली.त्यापूर्वी मी कधीही प्रार्थना केली नव्हती, पण त्यावेळी अम्मी वाचावी, म्हणून मी पहिल्यांदा प्रार्थना केली. मी अशा मुस्लीम कुटुंबात वाढलो होतो, जिथे प्रार्थना करण्यासाठी माझ्यावर कधीही दबाव टाकला गेला नाही कि कोणती सक्ती केली गेली नाही.मला गौरीशी लग्न करायचं आहे, हे मी जेव्हा अम्मीला सांगितलं, त्यावेळी गौरीच्या धर्माबद्दल तिने मला कुठलाही प्रश्न विचारला नाही. कुठल्याही व्यक्तीकडे ती केवळ माणूस म्हणून बघायची आणि त्यप्रमाणेच वागायची. तिच्या वागणुकीत धर्माचा संबंध कधीच आला नाही. कोणीही, कुठल्याही धर्माचा असो, गरज पडली तर त्या व्यक्तीच्या मदतीसाठी ती कायम पुढे असायची. तिचा हाच संस्कार आमच्या घरावर झाला. तिचे ऋण कधीही न फिटण्यासारखेच आहेत.
माझं जगण्याचं तत्त्वज्ञान ही खरं तर तिचीच देणगी आहे. अगदी तिच्यासकट कुठलीही गोष्ट शाश्वत नाही, हे तिनेच मला शिकवलं. त्यामुळे या क्षणी तुमच्याकडे जे आहे, त्याचा आनंद घ्या. कारण अगदी पुढच्याच क्षणीही ते तुमच्या पुढ्यातून हिरावून नेलं जाऊ शकतं. सगळं काही क्षणभंगुर आहे, याची शिकवण तिनं कृतीतून दिली. त्यामुळे आता मला कशानेच धक्का बसत नाही आणि मी कशाचीच फारशी तमाही बाळगत नाही. - माझं हे बोलणं थोडं रासवट वाटेल तुम्हाला कदाचित, पण या सगळ्या तर्काचं सार हेच आहे की, जर अम्मी माझ्यापासून हिरावली जाऊ शकते, तर काहीही हिरावलं जाऊ शकतं. आणि जर मी तिच्याशिवाय जगू शकतो, तर मी स्टारडम, पैसा किंवा बाकी कशाहीशिवाय जगू शकतो, नाही का? (संकलन : प्रतिनिधी)