Join us

लायन या चित्रपटातील सनी पवारची हजारो मुलांमधून केली गेली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 12:44 IST

लायन या चित्रपटातील सनी पवार ने नुकतीच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे. काळ्या रंगाच्या टक्सिकोमध्ये तो उठून दिसत ...

लायन या चित्रपटातील सनी पवारने नुकतीच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे. काळ्या रंगाच्या टक्सिकोमध्ये तो उठून दिसत होता तसेच त्यावर त्याने हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे छान शूज घातले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन ग्रॅथ डॅव्हिस यांनी केले असून सरू ब्रिले यांच्या खऱ्या आयुष्यावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. गुगल मॅपच्या मदतीने नायक आपल्या कुटुंबांचा कशाप्रकारे शोध घेतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात सरूच्या लहानपणीची भूमिका सनी पवार या बालकलाकाराने साकारली आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार मिळाले असून ऑस्करमध्येदेखील या चित्रपटाला अनेक नामांकने मिळाली आहेत. सरू मुंबईतील एका ट्रेनमधून नकळत अनेक किलोमीटर त्याच्या घरापासून दूर कोलकात्याला गेला होता आणि तेथील रस्त्यावर राहायला लागला होता आणि काही वर्षांनंतर एका ऑस्ट्रेलियातील जोडप्याने त्याला दत्तक घेतले होते.या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले त्यावेळी केवळ सनी पाच वर्षांचा होता. त्यावेळी या चित्रपटातल्या भावना त्याला कळत नव्हत्या. पण आता या भावना चांगल्याप्रकारे तो समजून घेऊ शकतो असे तो सांगतो. सरू या भूमिकेसाठी दिग्दर्शक ग्रॅथ डॅव्हिस एका मुलाच्या शोधात होते. त्यांनी अनेक शाळांमधून दोन हजारांपेक्षाही अधिक मुलांचे ऑडिशन घेतले होते. पण या ऑडिशनमधून त्यांना कोणीच मुलगा ही भूमिका साकारण्यासाठी योग्य वाटत नव्हता. पण सनीला पाहाताच क्षणी त्यांनी त्याची या भूमिकेसाठी निवड केली. सनीचे ऑडिशन घेत असताना मी हा चित्रपटच पाहात होतो असे मला वाटत होते असे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एका मुलाखतीत सांगितले आहे. सनी हा एका इंग्रजी चित्रपटात काम करत असला तरी त्याला इंग्रजी भाषा अजिबातच बोलता येत नाही. या चित्रपटात ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर सनी इंग्रजी बोलतो असे दाखवण्यात आले आहे. पण सनीला खऱ्या आयुष्यात केवळ हिंदी बोलता येते. त्यामुळे मुलाखतीच्या दरम्यान एक ट्रान्सलेटर सतत त्याच्यासोबत असतो. सनीला त्याची वाक्य पाठ करणे आणि डेव्हिड यांनी सांगितलेले समजून घेणे खूपच कठीण जात असे. या चित्रपटासाठी जगभर लोकांना भेटायला मिळत असल्याचा त्याला सध्या खूप आनंद होत आहे. सनीने अद्याप तरी कोणताही चित्रपट स्वीकारलेला नाही. पण पुढील काळात एखाद्या सुपरमॅनच्या चित्रपटात काम करण्याची त्याची इच्छा आहे. हृतिक रोशनच्या क्रिश या चित्रपटाचा तो फॅन आहे. सनी एक हुशार विद्यार्थी असून त्याला त्याच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याला गणित हा विषय खूप आवडतो. मी अभिनयात नाही आलो तर मी पोलिस बनेन असेही तो सांगतो.