Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्विमिंग पूलमध्ये सापडला या अभिनेत्रीचा मृतदेह, पतीने इन्स्टाग्रामद्वारे दिली निधनाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 18:13 IST

या अभिनेत्रीचे पती देखील अभिनेते असून ते काही कामासाठी घराच्या बाहेर गेले होते. ते परतल्यानंतर घरातील स्विमिंग पुलमध्ये त्या बेशुद्धावस्थेत आढळल्या.

ठळक मुद्देपाण्यात बुडल्यामुळे स्टेफनी यांचा श्वास गुदमरला गेला आणि त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही. त्याचमुळे त्यांचे निधन झाले असे त्यांच्या शवविच्छेदनात म्हणण्यात आले आहे. त्यांच्या मृत्युची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आता ही केस बंद केली आहे. 

कॅनडा मधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल स्टेफनी शर्क यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांनी आत्महत्या केली असून त्या 37 वर्षांच्या होत्या. त्यांचे निधन पाण्यात बुडल्यामुळे झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांचे निधन राहात्या घरी 20 एप्रिलला झाले. ईऑनलाईन डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, पाण्यात बुडल्यामुळे स्टेफनी यांचा श्वास गुदमरला गेला आणि त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही. त्याचमुळे त्यांचे निधन झाले असे त्यांच्या शवविच्छेदनात म्हणण्यात आले आहे. त्यांच्या मृत्युची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आता ही केस बंद केली आहे. 

स्टेफनी यांनी सीएसआईः सायबर या मालिकेत काम केले होते तर व्हेलन्टाईन्स डे या चित्रपटात त्या झळकल्या होत्या. तसेच पती डेमियन बिचिर यांच्यासोबत त्यांनी द ब्रिज या शो मध्ये काम केले होते. स्टेफनी यांच्या निधनानंतर त्यांचे पती डेमियन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून त्यांच्या निधनाबाबत सगळ्यांना सांगितले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शर्क आणि बिचिर कुटुंबियांद्वारे मला ही बातमी देताना अतिशय वाईट वाटत आहे. माझी पत्नी स्टेफनीचे निधन 20 एप्रिलला झाले. आमच्या सगळ्यांसाठी हा अतिशय वाईट आणि खडतर काळ आहे. या दुःखातून बाहेर पडायला आम्हाला किती वेळ लागेल हे आम्ही सांगू शकत नाही. स्टेफनीचे सौंदर्यं, तिचा आमच्यातील वावर, तिची एनर्जी आम्ही सगळे काही मिस करणार आहोत. स्टेफनी या जगातून गेली असली तरी ती कायम आमच्या हृदयात राहाणार आहे. आमच्या दुःखात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. पण सध्या आम्हाला शांततेची गरज आहे. माझ्या प्रिय स्टेफनीच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच एक इच्छा मी आता करू शकतो. 

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार डेमियन घराच्या बाहेर काही कामासाठी गेले होते. ते परतल्यानंतर घरातील स्विमिंग पुलमध्ये स्टेफनी बेशुद्धावस्थेत आढळल्या. पोलिसांना बोलावून डेमियन यांनी त्यांना याविषयी माहिती दिली होती. 

टॅग्स :हॉलिवूड