Join us  

70 वर्षांपूर्वी अभिनेत्याने लिहिलेले 'ब्रेकअप लेटर' 12 लाखांना विकले जाणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 3:13 PM

द गॉडफादर सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेते आणि ऑस्कर विजेते मार्लन ब्रँडो यांच्या ब्रेकअप लेटरचा आता लिलाव होणार आहे. 

नवी दिल्ली : सिनेसृष्टीत अभिनेते आणि अभिनेत्रींच्या ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्या खूप सामान्य आहेत. अशा बातम्या दररोज चर्चेत असतात. पण, यावेळी ही बातमी खूप खास आहे. कारण जवळपास 70 वर्षांपूर्वी ब्रेकअप झालेल्या एका अभिनेत्याची गोष्ट पुन्हा एकदा समोर आली आहे. द गॉडफादर सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेते आणि ऑस्कर विजेते मार्लन ब्रँडो (Actor Marlon Brando Break up Letter) यांच्या ब्रेकअप लेटरचा आता लिलाव होणार आहे. 

मार्लन ब्रँडो यांनी हे लेटर 1940 मध्ये आपल्या गर्लफ्रेंडला लिहिले होते आणि त्यामध्ये सांगितले होते की, तिला का सोडायचे आहे. मार्लन ब्रँडो यांनी हे लेटर आपल्या वाढत्या स्टारडमच्या वेळी लिहिले होते. हे लेटर बोस्टनस्थित आरआर ऑक्शनने सूचीबद्ध केले आहे. पेन्सिलने लिहिलेल्या या तीन पानांच्या लेटरमध्ये शुद्धलेखनाच्या अनेक चुका आहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या लिलावात हे लेटर 15,000 डॉलरमध्ये विकले जाऊ शकते.

हे ब्रेकअप लेटर फ्रेंच अभिनेत्री सोलेंज पोडेल यांना मार्लन ब्रँडो यांनी लिहिले होते. न्यूयॉर्कमध्ये ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायरच्या निर्मितीदरम्यान या दोघांची भेट झाली आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, काही काळानंतरच मार्लन ब्रँडो आणि सोलेंज पोडेल यांच्या नात्यात दुरावा आला. मार्लन ब्रँडो यांनी हॉलीवूडमध्ये जबरदस्त स्टारडम मिळवले, तर सोलेंज पोडेल फोटोग्राफर बनल्या.

"कृपया हे लेटर खुल्या मनाने स्वीकारा कारण ते चौथ्यांदा प्रामाणिकपणे लिहिले आहे. जेणेकरुन तुम्ही मला पूर्णपणे गावंढळ समजू नका, मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हे लेटर लिहित आहे. कारण मला तुम्हाला अपमानित आणि खालीपणा दाखवायचा नाही", असे मार्लन ब्रँडो यांनी हे ब्रेकअप लेटर लिहिताना म्हटले आहे. तसेच, या लेटरमध्ये मार्लन ब्रँडो यांनी आपल्या गर्लफ्रेंडची माफी मागितली आहे.

याचबरोबर, "आपुलकी, आदर आणि कौतुकाने नेहमी लक्षात ठेवेन", असे अभिनेते मार्लन ब्रँडो यांनी सोलेंज पोडेल यांना लिहिलेल्या लेटरमध्ये म्हटले आहे. दरम्यान, 2004 मध्ये निधन झालेल्या मार्लन ब्रँडो यांची 20 व्या शतकातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांमध्ये गणना होते. सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी दोन ऑस्कर, दोन गोल्डन ग्लोब आणि तीन ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार जिंकले.

टॅग्स :हॉलिवूडजरा हटकेव्यवसाय