Join us
Daily Top 2Weekly Top 5

जर तुम्ही कधी ‘हॅरी पॉटर’ बघाल तर हरमायनीचे ओठ नक्की बघा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 21:49 IST

‘हॅरी पॉटर’ या सुपरहिट सिनेमांच्या सिरिजमधील हॅरी, रॉन आणि हरमायनी तुम्हाला आठवत असेलच. हॅरी पॉटरची भूमिका साकारणारा डेनियल रेडक्लिफ, रॉन वीसलीची भूमिका साकारणारा रूपर्ट ग्रिंट आणि हरमायनीच्या भूमिकेत असलेली एमा वॉटसन आता हॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांमध्ये ओळखले जात आहेत.

‘हॅरी पॉटर’ या सुपरहिट सिनेमांच्या सिरिजमधील हॅरी, रॉन आणि हरमायनी तुम्हाला आठवत असेलच. हॅरी पॉटरची भूमिका साकारणारा डेनियल रेडक्लिफ, रॉन वीसलीची भूमिका साकारणारा रूपर्ट ग्रिंट आणि हरमायनीच्या भूमिकेत असलेली एमा वॉटसन आता हॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांमध्ये ओळखले जात आहेत. मात्र अशातही या सिनेमाची जादू तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळे तुम्हाला कधी या सीरिजचा ‘हॅरी पॉटर आणि पारस पत्थर’ हा पहिला सिनेमा बघण्याची संधी मिळाल्यास हरमायनीचे ओठ जरा काळजीपूर्वक बघा. तुमच्या लक्षात येईल की, शूटिंग दरम्यान हरमायनी म्हणजे एमा वॉटसन हॅरी आणि रॉनबरोबर त्यांचे डायलॉग बोलत आहे. एमा तिच्या आगामी ‘ब्यूटी अ‍ॅण्ड द बीस्ट’च्या प्रचारासाठी एबीसी चॅनेलच्या ‘जिमी किमेल’ लाइव्ह शोमध्ये पोहचली होती. तेव्हा तिला हॅरी पॉटर सीरिजच्या पहिल्या सिनेमाचे काही दृश्य दाखविण्यात आले. या दृश्यांमध्ये एमा तिचे सहकारी डेनियल आणि रूपर्टचे डायलॉग्स बोलताना दिसत आहे. ही क्लिप दाखविताना जिमीने म्हटले की, मला असे वाटतेय की, तुम्ही एमाच्या ओठांकडे लक्ष द्यायला हवे. ती आपल्याला याविषयी डिटेलमध्ये सांगणारच, परंतु तुम्ही अगोदर तिचा हा प्रताप काळजीपूर्वक बघाच. जेव्हा ही क्लिप दाखविण्यात आली, तेव्हा आम्हाला हसू आवरता आले नाही. एमाने या आठवणी सांगताना म्हटले की, तुम्हाला हसायला येते, परंतु माझ्यासाठी हे खूपच दुखदायक होते. क्रिस (दिग्दर्शक क्रिस कोलंबस) मला वारंवार सांगत होते, कट. एमा तू पुन्हा तेच करत आहेस, तू डॅनचे डायलॉग बोलत आहेस. क्रिसचे हे शब्द ऐकून मी त्याला माफी मागायची, परंतु स्वत:वर नियंत्रण ठेवणे मला अजिबात जमत नव्हते. माझ्या या चुकांमागे एकमेव कारण होते, ते म्हणजे मला हॅरी पॉटरचे सर्व पुस्तके खूपच आवडत असत. मी त्याचे वाचन केलेले असल्याने त्यातील लाइन अन् लाइन माझ्या मुखपाठ होती. त्यामुळे मी चांगले काम करणे हा एकच विचार करीत असे. मात्र कदाचित त्यात माझ्याकडून जरा जास्तच बोलले जात होते. एमाने केलेला हा खुलासा तिच्या फॅन्ससाठी नक्कीच मजेशीर ठरत असला, तरी त्यामागे तिची भावनाही समजण्यासारखीच आहे. आता हे सर्व कलाकार मोठे झाले असून, त्यांना पुन्हा या भूमिकेत प्रेक्षकांना बघणे जवळपास अशक्य आहे. परंतु तुम्ही जेव्हा केव्हा हॅरी पॉटर बघाल तेव्हा आवर्जून एमाच्या ओठांचे निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की, या सिनेमात एमा काय प्रताप करीत आहे!