गीगी हदीदने स्वत:च काढले स्वत:चे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 21:55 IST
अमेरिकी सुपरमॉडेल गीगी हदीद हिने ‘वी’ साप्ताहिकाच्या फोटोंसाठी स्वत:च कॅमेरा घेऊन स्वत:चे फोटो काढले आहेत. मॉडेलिंग क्षेत्रात वावरताना गीगीची ...
गीगी हदीदने स्वत:च काढले स्वत:चे फोटो
अमेरिकी सुपरमॉडेल गीगी हदीद हिने ‘वी’ साप्ताहिकाच्या फोटोंसाठी स्वत:च कॅमेरा घेऊन स्वत:चे फोटो काढले आहेत. मॉडेलिंग क्षेत्रात वावरताना गीगीची फोटोग्राफीची हौस कधीच लपून राहिली नाही. तिला जेव्हा संधी मिळते तेव्हा ती तिची आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असते. पेजसिक्स डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गीगीने या आठवड्यात फोटोग्राफर मारियो टेस्टिनो, अभिनेत्री साश लेन आणि डिझायनर ओलिवर रॉसटेनिंग यांचेही काही फोटो काढले. यावेळी ‘वी’ मॅगझिनचे संपादक स्टीफन गॅन फोटोशूट ठिकाणी पोहोचले होते. त्यांनी गीगीची फोटोग्राफी बघून तिचे कौतुक केले. त्याचबरोबर गीगीने शूट केलेले काही फोटोज् साप्ताहिकात प्रसिद्ध केले जाणार असल्याचे संकेतही दिले. स्टीफन गॅन यांच्या या कौतुकामुळे गीगी चांगलीच भारावून गेली होती. यासाठी तिने स्टीफन गॅन यांचे आभारही मानले होते. दरम्यान गीगीने ‘वी’ साप्ताहिकासोबत एका कार्यक्रमाचे आयोजन केले असून, कार्यक्रमात डिझायनर कार्ल लॅगरफेल्ड, डोनाटेला वर्साचे, टॉमी हिलफिगर आणि गीगीची बहीण बेला उपस्थित राहणार आहे. मॉडेलिंग क्षेत्रात काम करताना अगदी कमी कालावधीत गीगीने स्वत:चा लौकिक निर्माण केला आहे. मॉडेलिंग क्षेत्रात तिचा हा दबदबा माध्यम क्षेत्रात नेहमीच नावाजला गेला आहे. त्यामुळे गीगी आतापर्यंत जवळपास सर्वच सेलेब्स साप्ताहिकांच्या मुखपृष्ठावर झळकलेली आहे.