Join us  

 अन् अवार्ड सेरेमनीदरम्यान भर स्टेजवर अभिनेत्रीने उतरवले कपडे, सगळेच झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 10:29 AM

57 वर्षाची कोरिन मासेरियो स्टेजवर पोहोचली तीच मुळी गाढवासारखा पोशाख घालून. तिच्या या कॉस्च्युमवर रक्ताचे डाग होते. यापूर्वी की लोकांना काही कळावे, तिने स्टेजवर येताच भराभर तिचे कपडे उतरवणे सुरू केले...

ठळक मुद्देडिसेंबरमध्ये फ्रान्सचे शेकडो कलाकार, चित्रपट दिग्दर्शक, संगीतकार यांच्यासह इंडस्ट्रीतील अन्य मंडळींनी पॅरीसमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते.

होय, 57 वर्षाची हॉलिवूड अभिनेत्री कोरिन मासेरियो ( Corinne Masiero ) हिने काय करावे तर, पुरस्कार सोहळ्यातच सर्वांसमोर आपले कपडे उतरवून आपला विरोध व्यक्त केला.  शुक्रवारी सीझर अवार्ड सेरेमनीतील कोरिन मासेरियोच्या या कृत्याने काही क्षण खळबळ माजली. सीझर अवार्ड हा पुरस्कार फ्रान्समध्ये ऑस्करच्या दजार्चा मानला जातो. 57 वर्षाची कोरिन मासेरियो स्टेजवर पोहोचली तीच मुळी गाढवासारखा पोशाख घालून. तिच्या या कॉस्च्युमवर रक्ताचे डाग होते. यापूर्वी की लोकांना काही कळावे, तिने स्टेजवर येताच भराभर तिचे कपडे उतरवणे सुरू केले आणि ती नग्न झाली. हे सगळे कशासाठी तर आपला विरोध दर्शवण्यासाठी.

फ्रान्समध्ये तीन महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद आहेत. साहजिकच कोरोनामुळे. अभिनेत्री कोरिन मासेरियोने सरकारच्या याच निर्णयाचा विरोध करत, विरोधाचा हा मार्ग अवलंबला. तिच्या मते, नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद असल्यामुळे कलाकार त्रस्त आहेत. कोरोना महामारीच्या काळात सरकारने संस्कृती व कलेशी जुळलेल्या लोकांना मदत करायला हवी.

शुक्रवारी सोहळ्यादरम्यान कोरिन मासेरियोला बेस्ट कॉस्च्युम अवार्ड देण्यासाठी स्टेजवर बोलण्यात आले. पण तिने स्टेजवर येताच, सरकारचा निषेध करत कपडे उतरवले. हे बघून सगळेच थक्क झाले. कपडे उतरवल्यानंतर ती नग्नावस्थेत स्टेजवर उभी झाली. तिच्या शरीरावर ‘ना कल्चर, नो फ्युचर’ असा मॅसेज लिहिलेला होता. ‘आमची कला आम्हाला परत द्या,’ असा आणखी एक मॅसेज तिच्या पाठीवर लिहिलेला होता.  या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही कलाकारांनी देखील सरकारला ही मागणी केली होती. फ्रान्समधील स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी डिसेंबरपासून टॉकीज बंद आहेत.

डिसेंबरमध्ये फ्रान्सचे शेकडो कलाकार, चित्रपट दिग्दर्शक, संगीतकार यांच्यासह इंडस्ट्रीतील अन्य मंडळींनी पॅरीसमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. सरकारने ज्या पद्धतीने  अन्य जागांवरील बंदी काढली त्याच पद्धतीने कला केंद्रावरील बंदी देखील रद्द करण्यात यावी अशी या कलाकारांची मागणी आहे.

टॅग्स :हॉलिवूड