हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पामेला बाक हिच निधन झालं आहे. अभिनेत्रीने आत्महत्या करत जीवन संपवलं आहे. ती ६२ वर्षांची होती. पामेलाच्या आत्महत्येच्या बातमीने हॉलिवूडविश्वात खळबळ उडाली आहे. तिचे कुटुंबीय आणि चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे.
लॉस एंजेलिस येथील राहत्या घरात पामेलाचा मृतदेह आढळला. मेडिकल रिपोर्टनुसार, पामेलाने डोक्यात गोळ्या घालत आत्महत्या केली. बुधवारी(५ मार्च) ही घटना घडली आहे. तिच्या कुटुंबीयांकडून पामेलाच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. पामेलासोबत काहीच संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी तिचं घर गाठल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं.
"पामिलाच्या निधनाने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या कठीण काळात तुमचा सपोर्ट आणि प्रेम मिळालं याबद्दल आभारी आहोत. पण, या काळात आम्ही तुमच्याकडून एकांताची अपेक्षा करत आहोत", असं पामेलाच्या कुटुंबीयांकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं गेलं आहे.
पामेलाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. बेवॉच, नाइट रायडर यामधील भूमिकांसाठी ती ओळखली जाते. पामेलाने डॅव्हिड हसलहॉफसोबत १९८९ मध्ये लग्न केलं होतं. २००६ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. पामेला आणि डॅव्हिड यांना टेलर आणि हायले या दोन मुली आहेत.