Join us
Daily Top 2Weekly Top 5

विषारी किड्याला हात लावताच अभिनेत्याला जाणवू लागली हृदयविकाराची लक्षणं, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 18:52 IST

आलिया भटसोबत हॉलिवूडच्या सिनेमात झळकलेला अभिनेता पोर्तुगाल ट्रिपवर गेला होता. तिथे त्याने विषारी किड्याला हात लावला आणि त्याला हृदयविकाराची लक्षणं जाणवू लागली.

हॉलिवूडचा गाजलेला चित्रपट फिफ्टी शेड्स ऑफ ग्रेमधून लोकप्रिय झालेला अभिनेता जेमी डोर्नन (Jamie Dornan)त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत आला आहे. असे म्हटले जात आहे की, जेमीला पोर्तुगाल ट्रीपवर एका विषारी किड्याला हात लावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला या किड्यामुळे हार्ट अटॅकसारखे लक्षण जाणवू लागले होते आणि त्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जेमी डोर्ननचा मित्र गॉर्डन स्मार्टने ही माहिती दिली आहे. स्मार्टच्याबाबतीत असे घडले होते, ज्यामुळे त्यालाही रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

बीबीसीच्या द गुड, द बॅड अँड द अनएक्सपेक्टेड पॉडकास्टमध्ये गॉर्डन स्मार्टने याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, पोर्तुगालमधील गोल्फिंग रिसॉर्टमध्ये तो आणि जेमी व्हॅकेशनसाठी गेले होते. सुरूवातीला त्यांना थोडं विचित्र वाटू लागले म्हणून जेमी आणि गॉर्डनला वाटलं की जास्त ड्रिंक घेतली आहे. नंतर कळलं की, एका कॅटरपिलर या विषाणू किड्यामुळे असे वाटत आहे.

गॉर्डन स्मार्ट आणि जेमी डोर्ननला जाणवू लागली ही लक्षणं 

स्मार्टने सांगितले की, ट्रीपवर गेल्यावर दुसऱ्या दिवशी हे घडले. त्याला डाव्या हाताला मुंग्या आल्यासारखे वाटू लागले होते. त्याला वाटले की, हार्ट अटॅक येतो आहे. तो म्हणाला की, मी तसा हेल्दी माणूस आहे. मात्र एकदा तुमच्या मनात हार्ट अटॅक येतोय असा विचार आला की तेच विचार मनात घोळत राहतात. मग तसेच वाटू लागते. गॉर्डन स्मार्टला लगेच रुग्णालयात दाखल केले आणि मग त्याला डिस्चार्ज मिळाला. तो जेव्हा हॉटेलवर आला तेव्हा जेमी डोर्ननलाही तसेच वाटू लागले. याबद्दल गॉर्डन स्मार्ट म्हणाला की, जेमीने मला सांगितले की, गॉर्डन तू गेल्यानंतर २० मिनिटांनी माझा डावा पाय आणि हात सुन्न पडला होता आणि काही वेळानंतर मी स्वतःला अॅब्युलंसमध्ये पाहिले.

विषारी किडा ठरला असता जीवघेणा

डॉक्टरांनी स्मार्टला या घटनेच्या पुढच्या आठवड्यात कॉल केला आणि सांगितले की, हा त्रास एका विषारी किड्यामुळे झाला. ते म्हणाले की, नंतर आम्हाला कळले की दक्षिण पोर्तुगालमधील गोल्ड कोर्सवर विषारी किडे आहेत, ज्यामुळे कुत्रे मरत आहेत आणि ४० वर्षांच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येत आहे. नंतर आम्हाला हे देखील आठवले की आम्ही काही केसाळ सुरवंटांना स्पर्श केला होता आणि आमचे नशीब म्हणून आम्ही वाचलो. ४१ वर्षीय जेमी डोर्नन फिफ्टी शेड्स फिल्म फ्रँचायझीसाठी ओळखला जातो. तो शेवटचा नेटफ्लिक्स चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' मध्ये दिसला होता. यात त्याच्यासोबत आलिया भट आणि गॅल गडोत यांनी काम केले होते. 'द टुरिस्ट' या टीव्ही ड्रामा मालिकेतही तो दिसला आहे.