Join us

हेमंतचा शिवबाला मुजरा...

By admin | Updated: May 11, 2016 01:50 IST

अनेक विषय समर्पकपणे मांडणारा लेखक आणि अभिनेता म्हणजे हेमंत ढोमे. बऱ्याच सिनेमांच्या कथा लिहिल्यानंतर आता हेमंत स्वत: दिग्दर्शनाकडे वळत असल्याचे आम्हीच तुम्हाला सांगितले होते

अनेक विषय समर्पकपणे मांडणारा लेखक आणि अभिनेता म्हणजे हेमंत ढोमे. बऱ्याच सिनेमांच्या कथा लिहिल्यानंतर आता हेमंत स्वत: दिग्दर्शनाकडे वळत असल्याचे आम्हीच तुम्हाला सांगितले होते. परंतु चित्रपटाचे नाव काही समजू शकले नव्हते. आता हेमंतच्या या चित्रपटाच्या नावाचा खुलासा झाला असून, ‘बघतोस काय मुजरा कर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. एकदम हटके अन् कॅचिंग असे नाव असून, प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचणार यात काही शंका नाही. आता नावावरूनच हा सिनेमा शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित आहे का असे वाटत आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिनेमातूनदेखील एक वेगळा विषय मांडण्यात आला होता. आता हेमंत या चित्रपटातून नक्की कोणत्या विषयावर प्रकाश टाकणार आहे हे पाहणे खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘बघतोस काय मुजरा कर’ हे वाक्य आज लहान मुलांच्यादेखील तोंडी ऐकू येते. प्रत्येकाच्या जवळचा असणारा असा हा विषय असून, यामध्ये जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव आणि अक्षय टांकसाळे भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाविषयी ‘सीएनक्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना हेमंत म्हणाला की, माझ्या राजाला, शिवबाला मी या चित्रपटातून मुजरा देणार आहे. या सिनेमात शिवाजी आहेपण आणि नाहीपण. आता हे कसे काय होते ते चित्रपटातच पाहायला मिळेल. शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटी केलेला हा सिनेमा असल्याचे हेमंत सांगतोय. तो या चित्रपटात काय कमाल आणि वेगळे करतोय, हे आपल्याला काही दिवसांतच समजेल.