संजय घावरे मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका गाजला. त्यातही ‘सुमी’ चित्रपटातील चिन्याची भूमिका साकारणारा दिव्येश इंदूलकर हा बालकलाकार सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. कर्णबधिर असलेल्या दिव्येशने गाजवलेला पराक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
‘सुमी’ या चित्रपटातील दोन बालकलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले आहे. दिव्येशसोबतच टायटल रोलमध्ये असलेल्या आकांक्षा पिंगळे हिलाही राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. अपंगत्वावर मात करत दिव्येशने राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याने त्याचे यश लक्ष वेधणारे आहे. दादरला राहणारा दिव्येश बालमोहन विद्यामंदिरचा विद्यार्थी आहे. नुकतेच त्याने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले. दिव्येशची आई स्वाती आणि वडील शैलेंद्र हे दोघेही पूर्णत: मूकबधिर आहेत. त्यांना केवळ साईन लँग्वेज समजते. अशा परिस्थितीत दिव्येशने मिळवलेले यश खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरते. दिव्येशच्या यशात त्याची मावशी चित्रा मराठे यांचा मोलाचा वाटा आहे. बालपणापासून दिव्येशला घडवण्याचे काम त्यांनीच केले आहे. दिव्येशला श्रवणयंत्र लावल्याशिवाय ऐकू येत नसल्याने त्याला मोठी भूमिका मिळेल, असे वाटले नव्हते; पण सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शक अमोल गोळे यांनी दिव्येशवर विश्वास दाखवत ‘सुमी’मध्ये काम करण्याची संधी दिली. ‘सुमी’च्या संपूर्ण टीमने खूप सहकार्य केले. दिव्येशला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. आई-वडील आणि तो स्वत: अपंग असूनही त्याने घेतलेली ही गरुडझेप इतर कर्णबधिर मुलांसाठी प्रेरणादायी ठरणारी असल्याचे चित्रा म्हणाल्या.
दिव्येश हा जन्मत:च कर्णबधिर आहे. हिंदुजा रुग्णालयातील डॉ. कीर्तने यांनी दिव्येश दीड वर्षाचा असताना त्याचे कॉक्लिअर इम्प्लांटचे ऑपरेशन केल्याने उजव्या कानाला श्रवणयंत्र लावून तो ऐकतो. कर्णबधिर मुलांकडे शब्दसंपत्ती कमी असते. त्यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड येतो. दिव्येशचे तसे होऊ नये, यासाठी आम्ही त्याला मुलांमध्ये मिसळायला सांगायचो. त्याची शब्दसंपत्ती वाढावी आणि त्याला नीट बोलता यावे, यासाठी विद्या पटवर्धन यांच्या अभिनय कार्यशाळेत पाठवले. त्यामुळे त्याला अभिनयाची गोडी लागली. शाळेतील बालनाट्यांमध्ये काम करू लागला. त्याने मराठी मालिकांमध्ये लहान-सहान भूमिका साकारल्या आहेत. - चित्रा मराठे, दिव्येशची मावशी.