Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॅरी पॉटरचे घर विकणे आहे हो....!

By admin | Updated: September 21, 2016 11:06 IST

'हॅरी पॉटर' चित्रपटाच्या पहिल्या भागात हॅरी मावशीसोबत ज्या घरात राहताना दाखवले आहे, ते घर विक्रीस काढण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २१ -  एकेकाळी लहानांपासून-थोरांपर्यंत सर्वांना वेड लावणा-या 'हॅरी पॉटर' सीरीजचा करिष्मा अद्यापही कायम असल्याचे दिसून आले आहे. 'हॅरी पॉटर' चित्रपटाच्या पहिल्या भागात हॅरी डर्सली कुटुंबियांसोबत (मावशी, काका व भाऊ) ज्या घरात राहताना दाखवण्यात आला आहे, ते घर विक्रीस काढण्यात आले असून ते विकत घेण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. 
लंडनच्या पश्चिमेकडे सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या 'ब्रॅकनेल' येथे असलेले '१२ पिकेट पोस्ट' हे घर आजही हॅरी पॉटर चित्रपटातील '४ प्रिव्हेट ड्राईव्ह' याच नावाने प्रसिद्ध आहे.  २००१ साली प्रदर्शित झालेल्या ' हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफर्स स्टोन ' या चित्रपटात हे घर प्रथम दाखवण्यात आले होते. मूळचा जादूगार असलेला मात्र आई-वडिलांच्या निधनानंतर अनाथ झालेला हॅरी 'प्रिव्हेड ड्राईव्ह' येथील घरात त्याची मावशी, काका व भाऊ या डर्स्ली कुटुंबियांसोबत राहताना दाखवला आहे. त्या चित्रपटातील घरातील त्याची जिन्याखालची खोलीही खूप प्रसिद्ध झाली होती. मात्र पहिल्या भागानंतर इतर ८ भागांमध्ये या ख-या घराचा वापर न करता त्याचा सेट उभारण्यात आला होता. 
मात्र १५ वर्षानंतरही या घराची लोकप्रियता अद्यापही कायम असून 'हॅरी पॉटर' सीरीजचे अनेक चाहते आजही हे घर पाहण्यासाठी भेट देतात. नुकतीच या घराची दुरूस्ती (रिनोव्हेशन) करण्यात आली असून घराला आधुनिक साज देऊन ते विक्रीस काढण्यात आले आहे. रिअल इस्टेट एजन्सी चॅन्सलर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रीस काढताना या घराची किंमत ४ लाख ७५ हजार पाऊंड्स (सुमारे  ४ कोटी रुपये) इतकी निश्चित करण्यात आली आहे. घर विक्रीस काढताना त्याचा हॅरी पॉटरशी असलेला संदर्भ जाहीर करायचा नाही असे आम्ही ठरवले होते, मात्र घ राची विक्री होत असल्याच्या बातमीचा सुगावा मीडियाला लागला आणि तेव्हापासून हे घर विकत घेण्यात रस असणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे' असे एजन्सीच्या एका अधिका-याने सांगितले.