Genelia Deshmukh Comebac: अभिनेत्री जेनेलिया देशमुख अनेक वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर परतली आहे. आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'मधून जिनिलियानं बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं आहे. ती बऱ्याच काळानंतर एका मोठ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली. तिच्या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. जिनिलियानं कमबॅक केल्यानं तिचे चाहते खुश झालेत. पण, १० वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करताना जिनिलियाच्या मनात भीती होती. याबद्दल नुकतंच एका मुलाखतीमध्ये तिनं खुलासा केलाय.
जिनिलियाचं हे कमबॅक जितकं यशस्वी ठरलं, तितकंच तिच्यासाठी भावनिकदेखील होतं. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जिनिलियानं सांगितलं की, "मी गेली १० वर्षे मोठ्या पडद्यावर नव्हते. 'तेरे नाल लव्ह हो गया'नंतर काही ओटीटी प्रकल्पांमध्ये काम केलं, मला वाटत होतं की प्रेक्षक मला विसरले असतील. पण 'सितारे जमीन पर'मुळे समजलं की मी अजूनही त्यांची आवडती आहे. माझा भ्रम दूर झाला. माझ्या विचारांच्या अगदी उलट घडलं".
ती म्हणाली, "जेव्हा लोक असं म्हणतात की ते मला पुन्हा आणि पुन्हा पडद्यावर पाहू इच्छितात. तर ते ऐकून खूप छान वाटतं. एक अभिनेत्री म्हणून, जर कोणी असं म्हणत असेल की त्यांना अजून माझं काम पाहायचंय, तर तो एक फारच खास अनुभव आहे जो प्रत्येकाला मिळतोच असं नाही".
'सितारे जमीन पर'साठी जिनिलियानं ऑडिशन दिलं होतं. याबद्दल ती म्हणाली, "आमिर खानने मला कास्ट करायचं ठरवलं आणि त्याने माझे पतीला रितेश देशमुखला विचारलं की मी अजून काम करते का. त्यानंतर त्याने मला दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांना भेटायला सांगितलं. मी ऑडिशन दिलं आणि चित्रपट मिळाला. एवढ्या वर्षांनंतर ऑडिशन देणं थोडं वेगळं होतं, पण मला वाटतं की हीच खरी निवड प्रक्रिया आहे. त्यामुळे मी खूप उत्साही होते".