Join us

Exclusive: 'छोरी 2'मध्ये पहिल्यांदाच घडतंय असं काही...गश्मीरने साकारली अनोखी भूमिका; म्हणाला...

By ऋचा वझे | Updated: April 11, 2025 12:12 IST

'छोरी २' मधून गश्मीर अनेक वर्षांनी हिंदी सिनेमात दिसला आहे. सिनेमात त्याची भूमिका काय? 'लोकमत फिल्मी'शी बोलताना म्हणाला...

विशाल फुरिया दिग्दर्शित 'छोरी २' (Chhori 2) आज रिलीज झाला आहे. सिनेमात नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. लेकीला वाचवण्याचा तिचा संघर्ष यामध्ये दाखवण्यात आला आहे. २०२१ साली आलेल्या 'छोरी'चा हा सीक्वेल आहे. हॉरर आणि थ्रिलर अशा या सिनेमा गश्मीर महाजनीही (Gashmeer Mahajani) मुख्य भूमिकेत आहे. यानिमित्त 'गश्मीरने लोकमत फिल्मी'शी खास संवाद साधला

गश्मीर, तू खूप चोखंदळपणे भूमिका निवडतोस. 'छोरी २'मध्ये असं काय आवडलं ज्यामुळे तू होकार दिला?

सिनेमाचा दिग्दर्शक विशाल माझा जुना मित्र आहे. आधी मी त्याच्यासोबत एका प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं. त्यामुळे तो मला काहीतरी चांगलंच ऑफर करणार याची मला खात्री होती. त्याने 'छोरी २' विषयी विचारलं तेव्हाच मी होकार दिला. छोरी १ आणि आता २ मध्येही नुसरतचा संघर्ष दाखवला आहे. आपल्या मुलीला शोधण्यासाठी ती पॅरानॉर्मल गोष्टींना सामोरी जात असते. यातले पुरुष कलाकार खरतर निगेटिव्ह भूमिकेत मध्ये असतात. पण छोरी 2 मध्ये अभिनेता पहिल्यांदाच सकारात्मक भूमिकेत दाखवणार आहोत असं विशाल मला म्हणाला. माझी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आहे जो नुसरतची संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करत असतो.

नुसरतसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

फारच छान होता. खूप मजा आली. ती प्रोफेशनल आहे. तिच्यासोबत काम करणंही सहज होतं. आम्ही पहिल्यांदा काम करतोय किंवा एकमेकांना ओळखत नाही असं वाटत नव्हतं. 'झलक दिखला जा' करत होतो तेव्हा तिचे आणि माझे काही कॉमन फ्रेंड्स होते. पण आम्ही एकमेकांना आधी भेटलो नव्हतो. तरी सेटवर कधीच असं अनोळखी वाटलं नाही. तसंच हॉरर जॉनर असल्याने आमचं कामातच पूर्ण लक्ष होतं.

सिनेमा हॉरर आणि थ्रिलरही आहे. शूटिंगच्या सेटवर कसं वातावरण होतं? काही आव्हान किंवा अडचणी आल्या का

मला त्यांचा सेटअप खूप आवडला होता. शेतातला एक सीन होता. तर त्यासाठी त्यांनी कैकशे टन ऊस आणून फिल्म सिटी मध्ये लावला होता. ते मला फार भारी वाटलं. कारण शेतातला सीन म्हणजे आम्ही एखाद्या शेतात जाऊन शूट करु असं मला वाटलं होतं. पण त्यांनी शेतच फिल्मसिटीत लावलं असं मी पहिल्यांदाच पाहत होतो.

अडचणी तर काही आल्या नाही. पण मी तेव्हा आणखी एक शो करायचो ज्याचं शूट फिल्मसिटी मध्ये होतं. ते दिवसा असायचं आणि छोरी 2 हॉरर असल्याने रात्री शूट असायचं. मी फिल्मसिटीपासून 10 मिनिटांवर राहायचो त्यामुळे घरी येऊन आवरून लगेच शो च्या शूट ला जायचो. असं मी ते छोरी 2 चं शूट पूर्ण केलं होतं. हेक्टिक वाटलं पण मजाही आली.

तुझा पॅरानॉर्मल गोष्टींवर किती विश्वास आहे?

माझा फार विश्वास नाही. पण मला हे हॉररपट फिल्ममेकिंगच्या दृष्टीने खूप आवडतात. याचा भाग व्हायला आवडतं. म्हणूनच मी याला होकार दिला. आणि नुसतं हॉरर नाही तर त्यात काहीतरी स्टोरी ही असली पाहिजे. सिरिअस लेव्हलचं हॉरर आपल्याकडे खूप कमी होतं.मार्केटमध्ये हॉरर खूप चालतं लोकांना बघायला आवडतं. हॉलिवूडमध्ये तर ते पिढ्यानपिढ्या हॉरर करत आलेत. ते हा जॉनर एक्सप्लोर करत असतात. आपल्याकडे हे फार कमी प्रमाणात होतं. त्यामुळे मला हॉररपट सिनेमांचा भाग व्हायला कायम आवडेल.

सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. मात्र अनेकांनी थिएटरमध्ये यायला हवा होता अशा प्रतिक्रिया दिल्या. यावर तुला काय वाटतं?

हे पूर्णपणे निर्माते ,मेकर्सवर अवलंबून असतं. एखादा प्रोजेक्ट कोणत्या प्लॅटफॉर्मवर चालेल हे त्यांना जास्त माहीत असतं. असं हवं होतं हे बोलणं खूप बाळबोध आणि अर्धवट ज्ञानातून ठरेल. मार्केट फॉर्सेस काय आहेत याची कल्पना मेकर्सला जास्त असते. कोणत्या प्लेटफॉरवर काय चालेल हा अभ्यास जेवढा त्यांचा असतो तेवढा कलाकारांचा नसतो.तसंच प्रत्येक  सिनेमाची कुंडली असते की तो कुठे रिलीज होणार आहे. त्यामुळे आपण काहीही बोलून उपयोग नसतो. प्रत्येक सिनेमाचं वेगळं नशीब असतं.

टॅग्स :गश्मिर महाजनीनुसरत भारूचाबॉलिवूड