Join us

चित्रपट अभिनेत्री निम्मी कालवश; ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 22:25 IST

अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या निम्मी काळाच्या पडद्याआड

मुंबई: चित्रपट अभिनेत्री निम्मी यांचं निधन झालंय. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. बरसात, दीदार, दाग, उडन खटोला, मेरे मेहबूब, पूजा के फुल, आकाशदीप, लव्ह अँड गॉड या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.निम्मी यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला.  निम्मी यांचे नाव नवाब बानू आहे. राज कपूर यांच्या बरसात चित्रपटात त्यांचे निम्मी हे नाव ठेवण्यात आले. त्या लाहोरहून मुंबईत आल्यानंतर सरदार अख्तर आणि मेहबूब खान यांच्याकडे राहत होत्या. एकदा राजकपूर जद्दनबाई (नर्गिस यांची आई) यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांना ‘बरसात’ या चित्रपटासाठी हिरोइन हवी होती. बऱ्याच मुली पाहिल्यानंतरही त्यांना हवी तशी हिरोइन मिळत नव्हती. जद्दनबाईकडे आल्यानंतर शेजारी बसलेल्या निम्मी यांच्याकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी मेहबूब खान यांच्याजवळ जावून सांगितले, ‘ही मुलगी मला हिरोइन म्हणून हवी आहे.’ त्या वेळी निम्मी काही बोलल्या नाहीत. त्यांना त्यांच्या आजी काय म्हणतील याची भीती होती. 

सरदार अख्तर यांनी त्यांच्या आजीशी संपर्क साधला, विशेष म्हणजे त्यांच्या आजीनेही होकार दिला. त्यानंतर त्यांची स्क्रीन टेस्ट झाली आणि त्या उत्तीर्ण होऊन, त्यांची बरसात चित्रपटासाठी निवड झाली. पन्नाशीच्या दशकात अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या निम्मी यांचे नाव दिलीपकुमारसह अनेकांशी जोडले गेले. पन्नासच्या दशकात मधुबाला, नर्गिस, नूतन, मीना कुमारी, गीता बाली, सुरैया यांच्यासारख्या अभिनेत्रींसोबत काम करताना निम्मी यांनी आपले स्थान निर्माण केले. बरसात (१९४९), दीदार (१९५१), दाग (१९५२), उडन खटोला (१९५५) मेरे मेहबूब (१९६३), पूजा के फुल, अकाशदीप (१९६५), लव्ह अँड गॉड या चित्रपटातून निम्मी यांनी काम केले.  

टॅग्स :मृत्यू