Join us  

‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ मराठी वेबसीरिजचा धमाका, हिंदीला देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 7:20 AM

दुसरा एपिसोड आज रिलीज होणार, पहिल्या एपिसोडला सहा दिवसांत ८ लाख व्ह्यूज; ट्रेलर पाहूनच नेटिझन्सची ताणली गेली उत्सुकता

मुंबई : वेगळ्या धाटणीच्या, चाकोरी मोडणाऱ्या हिंदी वेबसीरिज इंटरनेटविश्वात ‘कल्ला’ करत असताना, एका मराठी वेबसीरिजनं तरुणाईला ‘याड’ लावलं आहे. ही वेबसीरिज आहे, शुद्ध देसी मराठीची ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’. एकदम हटके विषय, तरुण-तडफदार-लोकप्रिय कलाकार आणि एकदम ‘कूल’ सादरीकरण असा तिय्या जमून आल्यानं या वेबसीरिजचा ट्रेलर पाहूनच नेटिझन्सची उत्सुकता ताणली गेली होती. तीन मैत्रिणींची ही गोष्ट नेमकी आहे तरी काय, यावर चर्चा रंगली होती आणि सगळेच जण पहिल्या एपिसोडची वाट बघत होते. हा एपिसोड रिलीज झाला आणि त्यावर तरुणांच्या अक्षरश:उड्या पडल्या.

१८ मिनिटांच्या पहिल्या एपिसोडमधून पात्रांची ओळख झाली आणि ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट’ सारखंच काहीतरी होऊन गेलं. तरुण-तरुणी या पात्रांच्या प्रेमातच पडलेत आणि आता सगळेच पुढच्या एपिसोडची वाट पाहताहेत. त्यांची ही प्रतीक्षा आज संपणार असून दुसरा धमाकेदार एपिसोड गुरुवारी रिलीज होणार आहे. १६ डिसेंबरला या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर केवळ १५ दिवसांत ३० लाख नेटिझन्सनी पाहिला. त्यानंतर धमाका केला तो पहिल्या एपिसोडनं. ३ जानेवारीला रिलीज झालेला ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’चा पहिला एपिसोड केवळ ६ दिवसांत ८ लाख जणांनी पाहिला. त्यावर लाइक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा पाऊस पडलाय. या वेबसीरिजची लोकप्रियता हे आकडे पाहून सहज लक्षात येऊ शकते. हिंदी वेबसीरिजच्या लाटेत अगदीच अल्पावधीत चर्चेचा विषय ठरलेली, लक्ष वेधून घेणारी ही पहिलीच मराठी वेबसीरिज आहे.

शेअरचॅट प्रायोजित ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ ही वेबसीरिज सहा एपिसोडची आहे. ‘चौर्य’, ‘यंटम’ आणि ‘वाघेºया’ या सिनेमाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलंय. यात निखील चव्हाण, भाग्यश्री न्हालवे, सायली पाटील, आरती मोरे आणि ऋतुराज शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत. गेल्या आठवड्यात या वेबसीरिजचा पहिला एपिसोड फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि शेअरचॅटवर रिलीज करण्यात आला होता. आता दुसरा एपिसोड फेसबुक, यूट्यूबवर आणि शेअरचॅटवर रिलीज होणार आहे.ही वेबसीरिज पाहण्यासाठी लिंक:यूट्यूब : https://www.youtube.com/watch?v=MnE5Ti3UMXQ&t=3s

टॅग्स :स्त्रीलिंग पुल्लिंग