Join us  

10 वर्षांत एकही सिनेमा न करणारा फरदीन खान कसं जगतो इतकं लक्झरी लाईफ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 6:35 PM

Fardeen Khan Birthday : फरदीनचा ग्रॅण्ड डेब्यू झाला. पण सुपरस्टार बनण्याची किमया मात्र त्याला साधता आली नाही. हळूहळू बॉलिवूडपासून तो दुरावला.  

बॉलिवूडच्या स्टार किड्सचा इंडस्ट्रीत येणं आणि सुपरस्टार बनणं, हा प्रवास अनेकांना सोपा वाटतो. पण प्रत्यक्षात तसं नाही. बॉलिवूडमध्ये सहज एन्ट्री मिळाली तरी यापलीकडे प्रेक्षकांची मनं जिंकण्याच्या दिव्यातून स्टार किड्सला जावं लागतं. बॉलिवूडमध्ये ग्रॅण्ड एन्ट्री घेणारे अनेक स्टारकिड्स प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करण्यात अपयशी ठरतात, ते म्हणूनच. असंच एक उदाहरण म्हणजे, सुपरस्टार फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान (Fardeen Khan). आज फरदीनचा वाढदिवस.

फरदीनचा ग्रॅण्ड डेब्यू झाला. पण सुपरस्टार बनण्याची किमया मात्र त्याला साधता आली नाही. हळूहळू बॉलिवूडपासून तो दुरावला.  1998 साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे फरदीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. फरदीनच्या वडिलांनी म्हणजे फिरोज खान यांनीच हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. अगदी पदार्पणालाच फरदीनच्या वाट्याला फ्लॉप सिनेमा आला. यानंतर यशाची चव चाखायला त्याला 2000 सालची वाट पाहावी लागली.

होय, 2000 साली रिलीज झालेल्या ‘जंगल’ या सिनेमाने फरदीनला ओळख दिली. या चित्रपटातील फरदीनच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा हिट झाला. पण यानंतर 2001 साल उगवता उगवता फरदीन एका वादात सापडला.होय, 2001 साली फरदीनला कोकेन खरेदी करताना रंगेहात पकडलं गेलं. यानंतर त्याला अटकही झाली. पाठोपाठ रिहॅब सेंटरमध्ये त्याची रवानगी झाली. या प्रकरणाने अनेक वर्षे फरदीनचा पाठपुरावा केला. अखेर 2012 साली त्याची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली.

लव्ह के लिए कुछ भी करेगा, ओम जय जगदीश, हे बेबी, ऑल द बेस्ट अशा अनेक सिनेमात फरदीनने काम केलं. पण अचानक का कुणास ठाऊक त्याने चित्रपटांतून ब्रेक घेतला. यानंतर अनेक वर्षे तो बॉलिवूडमधून गायब झाला. यानंतर तो पुन्हा दिसला तेव्हा लोकांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. होय, वाढलेल्या वजनामुळे त्याला ओळखताही येईना.

फरदीन खान सध्या काय करतो, तर आपल्या वडिलांचा कोट्यवधी रूपयांचा व्याप सांभाळतो. फिरोज खान यांनी बेंगळुरूमध्ये शंभर एकरापेक्षा अधिक जमीन खरेदी केली होती. याठिकाणी त्यांचं एक फार्महाऊस आहे. या जमिनीवर लोकांसाठी अलिशान घरे बनवण्याची फिरोज खान यांची योजना होती. फिरोज खान ही योजना अमलात आणू शकले नाहीत. पण फरदीन खानने त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले. काही वर्षांपूर्वी गोदरेज प्रॉपर्टीजसोबत मिळून फरदीनने एक मोठी डील साईन केली होती. 2012 मध्ये फरदीनने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. यासाठी गोदरेज प्रॉपर्टीसोबत त्याने 100 कोटींची डील यशस्वी केली.रिअल इस्टेट बिझनेसशिवाय फरदीनचं एक फार्महाऊस आहे. मुंबई व अन्य शहरातही त्याची बरीच संपत्ती आहे. नेटवर्थबद्दल म्हणाल तर, फरदीनची नेटवर्थ सुमारे 307 कोटी आहे.

फरदीन लक्झरियस गाड्यांचाही शौकीन आहे. मर्सडीज बेंज एस-500, ऑडी क्यू7 सारख्या महागड्या गाड्यांचे कलेक्शन  त्याच्याकडे आहे. या गाड्यांची किंमतही जवळपास 2 कोटींपर्यंत आहे. 2013 मध्ये फरदीनची मर्सडीज बेंज एस-500 कार जुहूच्या एका हॉटेलच्या बाहेर कित्येक महिने धुळ खात पडून होती. त्यावेळी त्याची प्रचंड चर्चा झाली होती. फरदीनचं लग्न त्याची बालपणीची मैत्रिण नताशा माधवानीसोबत झालंय. त्यांना दोन मुलं आहेत. 

टॅग्स :फरदीन खानबॉलिवूड