Join us  

'एक होतं पाणी'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 5:12 PM

६ व्या नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'एक होतं पाणी' चित्रपटाने विशेष ज्युरी पुरस्कार पटकावला.

ठळक मुद्दे 'एक होतं पाणी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

विषयांचे नावीन्य आणि मार्मिक आशयप्रधान मराठी चित्रपटांनी साऱ्यांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करून घेतल्या आहेत. रसिक-प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या कथा आणि त्याची साजेशी मांडणी असणारे आपले मराठी चित्रपट सर्व स्तरांवर नावाजले जाताना दिसताहेत. असाच एक मानाचा मुजरा 'एक होतं पाणी'च्या निमित्ताने मराठी चित्रपटाला केला गेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तत्कालीन ज्वलंत विषय मांडणारा 'न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज' व 'काव्या ड्रीम मुव्हीज' प्रस्तुत ‘एक होतं पाणी' या चित्रपटाने अलीकडेच अंबरनाथ चित्रपट महोत्सवामध्ये बाजी मारलेली आणि आता सहाव्या नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार पटकावत आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. 

एका ज्वलंत सामाजिक विषयाला हात घालणारा 'एक होतं पाणी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाणी वाचवले तर आणि तरच आपली सृष्टी वाचेल असा संदेश यातून देण्यात आला आहे. या महोत्सवाप्रसंगी उपस्थित साऱ्यांनाच या चित्रपटाने चिंताग्रस्त केलं असून लेखक आशिष निनगुरकर व दिग्दर्शक रोहन सातघरे यांच्या दूरदृष्टीचं सगळ्यांनी खूप कौतुक केले. विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ निर्मित चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश अंधारे यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. पाणी हे जीवन आहे त्याचा वापर जपून करायला हवा असा मौलिक संदेश देणारा 'एक होतं पाणी' चित्रपट लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :एक होतं पाणी