Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dunki : शाहरुखच्या 'डंकी'ने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 08:43 IST

'डंकी'चे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. 

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पठाण, जवाननंतर शाहरुखच्या 'डंकी' सिनेमाच्या चाहते प्रतिक्षेत होते. अखेर  गुरुवारी(२१ डिसेंबर) डंकी सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशीच शाहरुखच्या 'डंकी'चे शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता 'डंकी'चे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. 

अॅडव्हान्स बुकिंगमधून 'डंकी'ने प्रदर्शनआधीच मोठी कमाई केली होती. या सिनेमाची तब्बल ५.६ लाख तिकिटे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये विकली गेली होती. यातून शाहरुखच्या चित्रपटाने १५.४१ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे डंकीच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये भर पडली. 'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार 'डंकी'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी ३० कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'डंकी'चे पहिल्या दिवसाचं कलेक्शन शाहरुखच्या 'जवान' आणि 'पठाण' सिनेमांच्या तुलनेत कमी आहे. २०२३च्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या 'पठाण'ने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती. तर सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'जवान' सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी ७५ कोटींचा गल्ला जमवत 'पठाण'चा रेकॉर्ड मोडला होता. पण, या दोन्ही सिनेमांचा रेकॉर्ड मोडणं डंकीला जमलेलं नाही. 

शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केलं आहे. या सिनेमात शाहरुखने 'हार्डी' हे पात्र साकारलं आहे. तर विकी कौशल, तापसी पन्नू, विक्रम कोचर, बोमन इराणी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'डंकी'मधील शाहरुखबरोबरच विकीच्या भूमिकेचंही कौतुक होत आहे. 

टॅग्स :डंकी' चित्रपटशाहरुख खानविकी कौशल