Join us

मोठी स्वप्नं पाहा, ती खरी होतात हा विश्वास मिळाला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:52 IST

दशावतार हा माझा निर्माता, दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात हा चित्रपट लोकप्रिय ठरतोय, याचं समाधान आहे.

- अंजली राठोड लोकमत न्यूज नेटवर्कहिंदी चित्रपटांना टक्कर देत ‘दशावतार’ घोडदौड करत आहे. मराठी चित्रपटाला एक नवी ऊर्जा देणाऱ्या ‘दशावतार’चे तरुण दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्याशी बातचीत...

बॉक्स ऑफिसवर चौथ्या आठवड्यातही ‘दशावतार’ची घोडदौड सुरू आहे...दशावतार हा माझा निर्माता, दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात हा चित्रपट लोकप्रिय ठरतोय, याचं समाधान आहे. मराठी चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली, ही ओरड ‘दशावतार’ने खोडून काढली. मराठी चित्रपट हिंदी चित्रपटाच्या तोडीस तोड झाल्याचा आनंद अधिक आहे. 

दशावतारच्या यशाची कल्पना आधी केली होती का? कल्पना केली नव्हती. तरीही चित्रपटाची भव्यता, त्याची व्याप्ती आम्ही आधीच निर्मिती करताना डोक्यात ठेवून होतो. मराठी चित्रपटाची तुलना नेहमी दाक्षिणात्य चित्रपटाबरोबर केली जाते. पण आपला चित्रपट लोकांनी चित्रपटगृहात येऊनच पाहिला पाहिजे, हे पक्के ठरवूनच मी, सुजय हांडे आणि ओंकार काटे निर्मितीत उतरलो. आपण प्रामाणिकपणे गोष्ट सांगितली आणि ती लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचली तर हमखास प्रेक्षक त्याला साथ देतील, याची खात्री आम्हाला होती. चित्रपट मराठी असला तरी त्याची भाषा चित्रभाषा आहे. महाराष्ट्राबरोबर दिल्ली, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटकातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. इतकेच नव्हे तर ‘दशावतार’च्या निमित्ताने गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच मराठी चित्रपट दाखल झाला आणि तो हाऊसफुलही झाला. अमेरिकेत या चित्रपटाचे १०० हून अधिक शो सुरू आहेत, तर कॅनडा, सिडनी, नाॅर्वे, स्वीडन, जपान, जर्मनी, सिंगापूर, माॅरिशस, आखाती देशांमध्ये चित्रपटाचे शो वाढताहेत. केवळ मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकही चित्रपटाला पसंती देताहेत. माझ्यासारख्या नव्या निर्मात्या दिग्दर्शकासाठी ही एक चांगली सुरुवात आहे.

दिलीप प्रभावळकर यांचाच विचार या चित्रपटासाठी केला होता की आणखीही कुणी डोळ्यांसमोर होते? बाबुली मेस्त्री या भूमिकेला विविध कंगोरे आहेत. त्याचा भावनिक आलेख पडद्यावर मांडण्यासाठी दिलीप प्रभावळकर यांच्याइतके प्रभावी नाव दुसरे कुणीच नव्हते. पण माझ्यासारख्या नवख्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला ते तयार होतील का याबद्दल आम्ही साशंक होतो. तरीही क्रिएटिव्ह निर्माते अजित भुरे यांच्या मदतीने आम्ही तिघे प्रभावळकरांना भेटलो. गोष्ट त्यांना ऐकवली. गोष्ट ऐकून त्यांनी विचारलं की खरंच हे तुम्ही पडद्यावर मांडू शकणार आहात? पण आम्ही पूर्ण तयारीने गेलो होतो. आमची तयारी आणि धाडस पाहून त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला असावा. पुढे त्यांनी या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत तर शब्दातीत आहे. चिकुनगुनियासारख्या आजारातून उठून या चित्रपटासाठी ते कोकणात आले.  बाबुली हे पात्र जिवंत साकारण्यासाठी त्यांनी दशावतारी कलाकारांबरोबर वर्कशाॅप्स केली. अनेकविध मेकअप आणि त्याबरोबरच जड पोशाखासहित विविध रूपे त्यांना या चित्रपटात साकारायची होती. शिवाय नदी, खाडीतल्या खोल पाण्यात, विविध जंगलात त्यांची दृश्ये चित्रित होणार होती. जंगलात चित्रीकरण करताना तर काहीवेळा आत बरेच चालावे लागे. पण कसलीही तक्रार न करता त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि बाबुलीच्या पात्रात अक्षरशः जीव ओतला. 

दशावतार ने तुला काय दिले? चांगली गोष्ट सांगण्याचे, ती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे समाधान मला ‘दशावतार’ने दिले. मराठी चित्रपटांवर लोकांचा विश्वास पुन्हा बसू शकतो, याची हमी दिली. मोठी स्वप्नं पाहिली आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर ती खरी होतात, हा आत्मविश्वास दिला. आणि चांगलं काम केलं तर प्रेक्षक नक्कीच त्या कामाला प्रतिसाद देतात, याची खात्री ‘दशावतार’ने पटवली. 

चांगल्या चित्रपटाची तुझी परिभाषा काय?सामान्य प्रेक्षकांना तुमचे कॅमेरा अँगल्स, तांत्रिक बाजू, बजेट यांच्याशी काही घेणेदेणे नाही. चित्रपटगृहात आल्यावर त्यांना खिळवून ठेवणारे पैसा वसूल मनोरंजन मिळणे आणि भावनिक दृष्ट्या चांगले पाहिल्याचे समाधान होणे, हीच माझ्या दृष्टीने चांगल्या चित्रपटाची परिभाषा आहे. आपण सांगितलेली गोष्ट दुसऱ्या मनापर्यंत खोलवर पोहोचणे आणि ती प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्याचा एक भाग वाटणे, हे जेव्हा कुठलीही कलाकृती साध्य करते- मग ते नाटक असो वा चित्रपट, कथा असो वा कविता- ती कलाकृती चांगली, असे मला वाटते.

English
हिंदी सारांश
Web Title : Believe in big dreams; they do come true, says Khanolkar!

Web Summary : Director Subodh Khanolkar discusses 'Dashavatar's success, stating it restored faith in Marathi cinema. He highlights the film's global reach and the dedication of actor Dilip Prabhavalkar, emphasizing the importance of honest storytelling and connecting with audiences emotionally.
टॅग्स :मराठी चित्रपट