विकी कौशल(Vicky Kaushal)च्या 'छावा' (Chhaava Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. पाच दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा आकडा पार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना महाराष्ट्रात खूप सन्मान दिला जातो आणि त्यामुळेच 'छावा'ची क्रेझ महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विकीच्या चित्रपटाची क्रेझ इतकी आहे की त्याने अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा २'चा रेकॉर्डही मोडला आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचेही खूप कौतुक होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने, महाराणी येसूबाईंची भूमिका रश्मिका मंदानाने तर औरंगजेबची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात अनेक मराठी चेहरे पाहायला मिळाले. बहिर्जी नाईकांची भूमिका देखील मराठमोळ्या अभिनेत्याने साकारली आहे.
छावा सिनेमात बहिर्जी नाईक यांची भूमिका अभिनेता शिवराज वाळवेकर (Shivraj Walvekar) यांनी साकारली आहे. त्यांनी या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. यात अभिनेत्याने बहिर्जी नाईक साकारताना महाराजांना मदत करताना विविध वेशभूषा रंगवल्या आहेत आणि त्यांनी त्यातून रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे. बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेतून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळत आहे.
शिवराज वाळवेकर यांनी छावा सिनेमातील लूकचा फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते की, लक्ष्मण उत्तेकर यांच्या छावा चित्रपटात बहिर्जी नाईकची भूमिका साकारण्याचा मान मिळाला. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. श्रीकांत देसाई यांनी हा लूक डिझाईन केला होता., मराठा सैन्याच्या गुप्तहेराच्या अविश्वसनीय भूमिकेत विविध पात्रे रंगवणे हा एक अत्यंत आनंददायी आणि भावपूर्ण पण आव्हानात्मक काम होते. बहिर्जी नाईक यांना त्यांच्या कौशल्य, बुद्धिमत्ता आणि मराठा साम्राज्यासाठी समर्पण आणि बलिदानासाठी माझी आदरांजली!
शिवराज वाळवेकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी मराठीशिवाय हिंदीतही काम केले आहे. त्यांनी मालिका आणि चित्रपटाव्यतिरिक्त जाहिरातीतही झळकले आहेत. छावाच्या आधी ते शाहिद कपूरच्या देवा या सिनेमात झळकले होते. याशिवाय त्यांनी अॅनिमल, ब्रह्मास्त्र, रॉ, चंदू चॅम्पियन, हेट स्टोरी ४, तान्हाजी, रौदळ, मिशन मजनू, ब्रह्मास्त्र, धर्मवीर, दगडी चाळ, मी शिवाजी पार्क, बॉईज ३ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवराज वाळवेकर यांनी वेबसीरिजमध्येही काम केले आहे.