Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पुष्पा २'साठी रश्मिकाने कॉपी केली महेश बाबूची स्टाइल? फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रीवल्ली म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 09:14 IST

'पुष्पा २' मधील रश्मिकाचा हा लूक महेश बाबूच्या सिनेमातील कॉपी असल्याचं म्हटलं जात आहे. यावर रश्मिकाने प्रतिक्रिया दिली आहे.

अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा : द राइज' या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेडं करून सोडलं होतं. २०२१ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रचंड गाजला. अल्लू अर्जूनसोबत या सिनेमात रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत होती. या सिनेमातील गाणी आणि डायलॉग्सही प्रचंड व्हायरल झाले होते. आता या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 'पुष्पा २'चं शूटिंग जोरदार सुरू असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमातील श्रीवल्लीचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या वाढदिवशी 'पुष्पा २'मधील तिचा लूक प्रदर्शित करत चाहत्यांना खास सरप्राइज देण्यात आलं. या पोस्टरमध्ये रश्मिकाने हिरव्या रंगाची भरजरी साडी नेसून साज केल्याचं पाहायला मिळत आहे. हातात बांगड्या आणि गळ्यात दागिने घालत तिने पारंपरिक साज केला आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि केसांत सिंदूरही दिसत आहे. 'पुष्पा २'मधील श्रीवल्लीचा हा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. पण, 'पुष्पा २' मधील रश्मिकाचा हा लूक महेश बाबूच्या सिनेमातील कॉपी असल्याचं म्हटलं जात आहे. 

'पुष्पा २'मधील श्रीवल्लीच्या पोस्टरमध्ये रश्मिका हाताचं बोटांमधून बघत असल्याचं दिसत आहे. तिच्या या स्टाइलची तुलना महेश बाबूच्या स्टाइलशी होत आहे. महेश बाबूच्या गुंटूर कारम या सिनेमातील एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये महेश बाबूदेखील रश्मिकाप्रमाणेच डोळ्यावर हात ठेवून बघत असल्याचं म्हटलं आहे. महेश बाबूच्या एका फॅन पेजवरुन रश्मिका आणि महेश बाबूचा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यावर रश्मिकाने प्रतिक्रिया देत "ओह..वॉव...मला हे कोलाज आवडलं", असं म्हटलं आहे. 

दरम्यान, 'पुष्पा २ : द रुल' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'पुष्पा २'च्या सेटवरील काही फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे या सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

टॅग्स :रश्मिका मंदानामहेश बाबूपुष्पा