Join us  

बॉलिवूडमध्ये गाजतेय सई ताम्हणकर! अंमली पदार्थांच्या तस्करीचा देसी जुगाड, पाहा 'Dabba Cartel'चा जबरदस्त टीझर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 12:24 PM

अभिनेता-फिल्ममेकर फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या सीरिजमधून सई ताम्हणकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकरसाठी वर्ष २०२४ हे खास ठरतंय. सई एकापाठोपाठ एक सिनेमा आणि सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच सईचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असणाऱ्या 'भक्षक'मध्ये सई महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. आता पुन्हा एकदा सई 'डब्बा कार्टेल' या मल्टीस्टारर सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

'डब्बा कार्टेल' या आगामी वेब सीरिजचा फर्स्ट लूक समोर आला.  त्यामध्ये सई ताम्हणकरची झलक पाहायला मिळत आहे. सईने 'डब्बा कार्टेल' सीरिजचा टीझर तिच्या सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यामुळे सई आता पुन्हा एकदा या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी गाजवायला सज्ज झाली आहे. 

 अभिनेता-फिल्ममेकर फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिबानी दांडेकर ही सीरिज घेऊन येत आहेत. नेटफ्लिक्सवर 'डब्बा कार्टेल' ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.  'डब्बा कार्टेल' ही एक ड्रगचा अवैध व्यापार करणाऱ्या महिलांची कहाणी आहे. यामध्ये शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, सई ताम्हणकर, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अशी दमदार कलाकारांची फौज आहे.  1 मिनिट 11 सेकंदाचा टीझर पाहिल्यानंतर प्रत्येकजण सीरिजच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. निर्मात्यांनी रिलीजच्या तारखेबाबत कोणतेही अपडेट दिलेलं नाही. 

 सई ताम्हणकर सध्या मनोरंजन विश्वातील जवळपास सर्वच प्लॅटफॉर्मवर दिसते आहे. बोल्ड आणि बिनधास्त असलेल्या सईचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. सई सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सईने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. सई 'हंटर' आणि 'मिमी' या बॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. आगामी काळात सई कोणकोणत्या प्रकारच्या भूमिका साकारताना दिसेल, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटीबॉलिवूडनेटफ्लिक्सफरहान अख्तरशिबानी दांडेकरभूमी पेडणेकर शबाना आझमी