Join us

एक दिवसाचा रोजा आणि इफ्तार पार्टी महागात पडली, थलापती विजयविरोधात तक्रार दाखल, पण कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:54 IST

इफ्तार पार्टी थलपती विजयला महागात पडली आहे. थलपती विजयविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

साऊथ स्टार थलपती विजयने काही दिवसांपूर्वीच मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. अभिनय सोडून राजकारणात सक्रिय झालेल्या थलपती विजयने त्याच्या राजकीय पक्षातर्फे इफ्तार पार्टी आयोजित केली होती. यासाठी त्याने एक दिवसाचा रोजाचा उपवासही केला होता. शिवाय थलपती विजयने या इफ्तार पार्टीत नमाज पठण करत रोजाचा उपवास सोडला होता. त्याचे इफ्तार पार्टीतील फोटोही व्हायरल झाले होते. चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. मात्र ही इफ्तार पार्टी थलपती विजयला महागात पडली आहे. थलपती विजयविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

थलपती विजयने इफ्तार पार्टी दरम्यान मुस्लीम समाजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तामिळनाडूमधील सुन्नत जमावाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या इफ्तार पार्टीत दारू पिणारे लोकही सहभागी झाले होते. ही इफ्तार पार्टी मुस्लीम बांधवांप्रति असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असा आरोप करण्यात आला आहे. अशा घटना पुन्हा होऊ नये, म्हणून ही कारवाई करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

या इफ्तार पार्टीतील थलपती विजयचे फोटो व्हायरल झाले होते. त्याने पांढऱ्या रंगाचे कपडे घालत मुस्लिम बांधव परिधान करतात तशी स्कल टोपीही घातली होती. दरम्यान, थलपती विजय अलिकडेच प्रदर्शित झालेल्या द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT) या सिनेमात दिसला होता. आता तो 'जन नायकन' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :रमजानसेलिब्रिटीTollywood