शाळेत असताना वाटायचं की , आपणही लवकर मोठं व्हायला पाहिजे. आणि आता मोठे झालोय तर शाळेच्या युनिफॉर्मचं वेड लागलंय ! आणि विशेष म्हणजे तेव्हाही वेळेनं आपलं ऐकलेलं नव्हतं आणि आताही ती ऐकत नाही !आता तो युनिफॉर्म नाही, पुस्तकांचा वास नाही, ते मित्र मैत्रिणी नाहीत …लहानपणी आपल्याजवळ असाव्यात असं वाटणाऱ्या बऱ्याचशा वस्तू आपल्याजवळ असतात; पण ज्या असाव्यात असं वाटतंय त्या आता अजिबात मिळत नाहीत… वस्तूंनी आयुष्य सजवता येत नाही हे तेव्हाही कळलं नव्हतं आणि आताही कळत नाही .
काळानं सगळं आपल्याबरोबर वाहून नेलंय तरीही आपली उलटं पोहण्याची आशा संपत नाही. पण काही लोक काळानं वाहून नेलेल्या गोष्टींनी निराश होत नाहीत. आयुष्याला अधिक सर्जनशील बनवण्याचा प्रयत्न करतात… बनवतात ! 'मी तिथंच उभा आहे जिथं तू मला सोडून गेलेली होतीस. ' हे वाक्य बोलणारा रामचंद्रन आपल्या डोळ्यातून टचकन पाणी काढतो . हे असं छान प्रेम करता येऊ शकतं ! आपल्या हायस्कुलच्या काळात अबोल असलेला राम सबंध सिनेमात शेवटच्या क्षणी धीरोदात्त उभा असलेला दाखवला आहे. त्याच्या अशा अबोल राहण्यानं राम आणि जानकीची प्रेमकहाणी वेदनादायी वळणं घेत अपूर्ण राहते. हायस्कुलात झालेल्या प्रेमाचा पाठलाग करत राम जानकीवर आजही तितकंच प्रेम करतो आहे आणि जानकीही रामवर …! पण आता जानकी विवाहित असल्यामुळं ही प्रेमकहाणी 'मोनोगॅमस मॅरीज सिस्टीम' मध्ये असफल आहे . परंतु ही कहाणी अशीच अभंग, आतुर राहणार आहे, हे 'सुफळ संपन्न' शेवट बघून खुश होणाऱ्या प्रेक्षकांना रुचलं असेल का ..? काहीही असो, सिनेमा व्यावसायिक पातळीवर यशस्वी झाला !
या सिनेमाच्या कथेवर आधारित तीन भाषेत सिनेमे झाले .
- 96 - त्रिशा आणि विजय सेतुपती -2018 (तमिळ)
- 99 - गणेश आणि भावना -2019 (कन्नड)
- जानू- समंथा अक्कीनेवी आणि शर्वानंद -2020 (तेलगू )
हायस्कुलमधल्या जानूचं पात्र तामिळ आणि तेलगू दोन्ही सिनेमात गौरी किशन या अभिनेत्रीनं अतिशय मनभावक साकारलं आहे. तिन्ही भाषेतले संवाद, घटना जशाच्या तशा चित्रित केल्या आहेत. तामिळ आणि तेलगू भाषेत तर अगदी सेम टू सेम ! तिन्ही सिनेमे सेम टू सेम असूनही गुणी कलाकरांमुळं बघायला छान वाटतात !
रियुनिअनच्या निमित्तानं जमा झालेल्या मित्रांमध्ये राम आणि जानू म्हणजे जानकीही असते. या रियुनियनसाठी ती सिंगापूरहुन आलेली असते. बावीस वर्षांनंतर एकमेकांना दोघेही पहात असतात. जानू येणार आहे म्हटल्यावर राम पूर्वीसारखाच अस्वस्थ होतो. शाळेत असताना फक्त जानूमुळं उत्तम हजेरी देणारा राम, तिला सुट्ट्यांमध्ये पाहता येणार नाही म्हणून अस्वस्थ झालेला राम, रामला जानूचा सहवास हवा आहे; पण राम लाजतो आहे. तिचं त्याच्यापेक्षा उजवं असणं, हे कारण तो शेवटी सांगतो. राम निष्पाप आहे; त्याला जानूला स्पर्श करणंही गैर वाटतं.
रियुनियन संपल्यावर राम आणि जानू दोघे हॉटेलकडे निघतात. या हॉटेलवर जानू थांबलेली असते. पहाटेचं विमान घेऊन ती त्रिचीपल्ली आणि तिथून सिंगापूरला जाणार असते. रामचं पूर्वीसारखंच अबोल असणं जानूला खटकतं. ती गाडीचा दरवाजा उघडून हॉटेलमध्ये घुसते. आपल्या रूममध्ये जाते, आणि मग न राहवून रामला फोन करते. त्याला विचारते की, ' तू निघून गेलास काय ? ' तेव्हा तो तिला म्हणतो , ' जानू मी तिथंच आहे जिथं तू मला सोडून गेली होतीस …! ' हे वाक्य अंगावर काटा आणतं. मग जानू सकाळच्या आपल्या विमानाची वेळ होईपर्यंत रामसोबत भावनांची देवाणघेवाण करते . तेव्हा संवादात हुकलेल्या आणि चुकलेल्या गोष्टींमुळं एकत्र येणं कसं मागं पडलं, हे दोघांनाही कळतं तेव्हा दोघंही प्रचंड रडतात. आता हे चुकलेलं दुरुस्त करता येणार नसतं .
हॉटेलात कॉफी प्यायला गेल्यावर तिथं आलेल्या रामच्या विद्यार्थ्यांना जानूला बघून आश्चर्य वाटतं. जानू त्यांना आपण रामची पत्नी असल्याबद्दल सांगते आणि जिथून गोष्टी चुकलेल्या होत्या, हुकलेल्या होत्या तिथून त्या दुरुस्त करून सांगण्याचा प्रयत्न करते … हे त्रिशाच्या (नायिका) डोळ्यांत बघून ऐकताना प्रेक्षकही भावुक होतो. जानकीची ही सकारात्मकता प्रेक्षक म्हणून भावते. दिग्दर्शकानं नायकाला मर्यादा पुरुषोत्तम राम नाव देऊन त्याची भावनांवर आवर घालण्याची वृत्ती अधोरेखित केलेली आहे. दोघेही नायक आणि नायिका 'राम ' आणि 'जानकी' ही नावं त्यासाठीच धारण करतात ! दिग्दर्शक स्वतः या पटकथेत गुंतलाय, असं कित्येक ठिकाणी वाटतं !
गैरसमजांमुळं किंवा काही करणांमुळं जे घडू शकलं नाही, त्याची सकारात्मक कल्पना करून नायकाच्या विद्यार्थ्यांना ऐकवणारी नायिका तिच्या या आशावादामुळं भावते. कहाणी सांगताना तिला भेटायला तिच्या कॉलेजात आलेल्या तरुण नायकाचं वर्णन तिच्या तोंडून ऐकावं. आणि एका क्षणाला ती जेव्हा नायकाच्या तोंडून 'जानू' , हे आपलं नाव ऐकते आणि त्याच्या मिठीत सामावते, हा प्रसंग आपल्या डोळ्यांतून पाणी काढल्याशिवाय रहात नाही. हा या सिनेमातला सगळ्यात सुंदर क्षण वाटतो. आपल्या प्रिय माणसाला भेटण्याची अधीरता आणि उत्कटता गौरी किशन या अभिनेत्रीनं लाजवाब जगली आहे ! जानूला विमानात बसवायला जाताना जानू आणि राम दोघेही अस्वस्थ झालेले आहेत . गाडी चालवणाऱ्या रामच्या नकळत जानू आपला हात गियर हँडलवर ठेवते आणि राम निग्रहानं तिच्या हातावर हात ठेवतो आणि गियर्स बदलत विमानतळापर्यंत येतो . एवढा वेळ कोरडे आणि संकोचत स्पर्श केलेले दोघेही यावेळी एकमेकाला अशा रीतीनं हिरवागार स्पर्श करतात ! शेवटच्या दृश्यात निरोप घेतेवेळी राम जानूकडं पापणी न लवता पहात राहतो. त्याचं हे पाहणं जानूला अत्यंत वेदना देणारं आहे. राम तिला आपल्या डोळ्यांत शेवटचं सामावून घेत असतो.
पटकथा, संगीत, अभिनय, शॉट सिलेक्शन या पातळीवर सिनेमा दर्जेदार आहे ! सिनेमाचं संगीत अप्रतिम आहे ! कित्येकदा ऐकूनही या संगीताची भूक भागत नाही ! ' कादले कादले ' या गाण्यातलं व्हायोलिन आणि बासरी ऐकून आपण गुगल करायला लागतो की हे कुणी वाजवलंय म्हणून … गोविंद वसंता … हा संगीतकार जादूगार आहे !
सिनेमात संदर्भ आलेल्या एस. जानकी यांची गाणी आपण यापूर्वी ऐकलेली होती. पण अशी सुंदर आठवण होणं आनंददायी आहे. ' दिल से ' सिनेमाचा तामिळ डब 'उयीरे' हा सिनेमा आहे . त्यातलं 'नेंजीनील्ले' हे गाणं ऐका ! प्रशांत आणि सिमरनची भूमिका असलेला 1999 चा तामिळ सिनेमा 'जोडी ' मध्येही एस. जानकी यांनी गाणी गायलेली आहेत. हिंदीतल्या 'डोली सजा के रखना' मध्ये रहमाननं हे ट्रॅक्स वापरले आहेत .
दाक्षिणात्य सिनेमातला नायक प्रोटॅगोनिस्ट वाटतो. तो सुंदर, श्रीमंत, उच्च जाती धर्मातला असत नाही शक्यतो . और तो और तो दिसतोही तुमच्या आमच्यासारखाच . त्यामुळं तो सर्वसामान्य व्यक्तित्व असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला आपला वाटत असतो .
राम आणि जानू व त्यानिमित्तानं आपल्याही मनातला शाळेतला पोरगा आणि पोरगी हा सिनेमा अलवार हात घालून बाहेर काढील, यात शंका नाही ! तो / ती बाहेर नाही आला तर मग नाईलाज आहे - तुम्हाला तुमच्या बॉसला प्रेझेंटेशन वेळेत देण्याचं टेन्शन असेल , नोकरी - व्यवसायाच्या अडचणी असतील , शेती किंवा कौटुंबिक अडचणी असतील वगैरे …कारण सिनेमातलं आयुष्य बघून ' आपलंही असंच होतं किंवा असावं ', असं वाटणाऱ्या प्रेक्षकांची संख्या सिनेमाला जगवत आहे !
ज्यांना शाळा, पुस्तकांचा वास , आपल्याला आवडणारी व्यक्ती, मित्र, मैत्रीण, शिक्षक, शिक्षिका , मुख्याध्यापक , शिपाई यांपैकी कुणाहीसाठी शाळेत हापापल्यासारखं जाणं आणि त्यांच्या विरहानं उदास होऊन येणं, प्रेमळ व्यक्ती इत्यादी गोष्टी आठवतात, आठवायच्या आहेत त्यांनी हा सिनेमा जरूर बघा. हा सिनेमा बघून आपल्या शाळेतल्या मित्र -मैत्रिणींचं रियुनियन करा. (कित्येक लोकांनी ते केलंही असेल. )
सिनेमा संपल्यानंतर रामनं आपल्या सुटकेसमध्ये शाळेच्या ड्रेससोबत रात्री पावसात भिजलेला जानूचा ड्रेस ठेवला आहे... राम जानूला असाच भेटत राहील किंवा न भेटेल ; पण त्याच्याजवळ जपलेला हा ठेवा आपल्याही मनात रुतून राहतो. सिनेमाच्या शेवटच्या दृश्यात सुटकेस बंद होते… आणि आपल्या आठवणींची सुटकेस उघडते !
- अमित प्रभा वसंत.